कुविख्यात माओवादी सुजाता यांना अटक
हैद्राबाद : कुविख्यात माओवादी सुजाता यांना तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. सुजाता यांना पकडून देणाऱ्यांसाठी 1 कोटी रुपयांचे इनाम लावण्यात आले होते. त्यांच्या अटकेमुळे माओवाद्यांना मोठा झटका बसला असून माओवादी कारवायांवर या अटकेचा परिणाम होण्याची शक्यता आहे. छत्तीसगड येथील कोठागुडम येथे त्या एका रुग्णालयात जात असताना त्यांना अटक करण्यात आली. कित्येक दिवस त्या भूमिगत होत्या. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीवरुन त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत होती. महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या चारही राज्यांची सरकारे त्यांना पकडण्यासाठी प्रयत्नशील होती. सुजाता या माओवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या असून त्यांनी अनेक उच्च पदांवर कामे केली आहेत. माओवाद्यांच्या बस्तर येथील विभागाचे उत्तरदायित्व त्यांच्यावर सोपविण्यात आले होते. त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने छत्तीसगड येथे होते. 4 ऑक्टोबरला छत्तीसगडमध्ये माओवाद्यांविरोधात मोठे अभियान हाती घेण्यात आले होते. त्या अभियानात 31 माओवादी ठार झाले होते. त्यानंतर सुजाता यांना अटक करण्यात आल्याने हा माओवाद्यांवर दुहेरी आघात आहे, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.