कुख्यात माओवादी मदवी हिदमा ठार
आंध्र प्रदेश पोलिसांकडून मंगळवारी एन्काऊंटर
वृत्तसंस्था /विजयवाडा
सुरक्षा दलांविरोधात आणि नागरीकांविरोधात 26 वेळा भीषण हल्ले करणारा कुख्यात माओवादी मदवी हिदमा याला आंध्र प्रदेशात ठार करण्यात आले आहे. आंध प्रदेश पोलिसांनी राज्याच्या अल्लुरी सिताराम राजू जिल्ह्यात त्याचा मंगळवारी एन्काऊंटर केला. त्याच्यासह त्याची पत्नी आणि अन्य चार माओवाद्यांनाही या चकमकीत संपविण्यात आले आहे. हिदमा 43 वर्षांचा होता, अशी माहिती आहे. हिदमा याच्यावर 50 लाख रुपयांचे इनाम लावण्यात आले होते. तो छत्तीसगडमधील 2010 च्या दंतेवाडा हल्ल्याचा सूत्रधार होता. त्या हल्ल्यात अनेक काँग्रेस नेत्यांचा मृत्यू झाला होता. तसेच तो 2013 च्या झीराम खोरे हत्याकांडाचाही प्रमुख होता. त्याच्या नावावर 2021 मधील सुकमा-बिजापूर हल्लाही नोंद आहे. त्याच्यावर गेले कित्येक महिने पोलिसांचे लक्ष होते. अखेर मंगळवारी तो पोलीसांच्या कचाट्यात सापडला. यावेळी झालेल्या चकमकीत त्याला मारण्यात आले, अशी माहिती आंध्र प्रदेश प्रशासनकडून देण्यात आली आहे.
गुप्तचरांकडून माहिती
हिदमा त्याच्या सहकाऱ्यांसह कोठे लपला आहे, याची नेमकी माहिती गुप्तचरांनी पुरविल्यानंतर, त्याच्याभोवती सुरक्षा सैनिकांचे जाळे विणण्यात आले. आंध्र प्रदेश-छत्तीसगड-ओडीशा सीमारेषेवर त्याच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले. तथापि, त्याच्या सहकाऱ्यांनी शरण येण्यास नकार देत गोळीबार केला. त्यामुळे प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा सैनिकांनाही गोळीबार करावा लागला. या चकमकीत त्याच्या आणि त्याच्या पत्नीसह सहा माओवादी ठार झाले आहेत. त्याच्या पत्नीचे नाव राजक्का असे आहे. ती त्याची द्वितीय पत्नी होती. या एन्काऊंटरची माहिती जिल्ह्याचे पोलिस महानिरीक्षक अमित बरदार यांनी पत्रकारांना मंगळवारी या घटनेनंतर दिली आहे.
आईने केले होते आवाहन
एक आठवड्यापूर्वीच्या हिदमा याची आई मदवी पुंजी यांनी त्याला हिंसाचाराचा मार्ग सोडण्याचे कळकळीचे आवाहन केले होते. त्याने सरकारला शरण यावे आणि पुढचे जीवन शांतपणे जगावे. त्याने स्वीकारलेल्या मार्गामुळे कोणाचेही भले होणार नाही, असा संदेश त्याच्या आईने त्याला दिला होता. त्याच्या मातेने सुकमा येथे छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विनय शर्मा यांची भेट घेतली होती. त्यानंतर तिने आपल्या पुत्राला शरण येण्याविषयीचे हे आवाहन केले होते.
मदवी हिदमा कोण होता...
मदवी हिदमा याचा जन्म छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 1981 मध्ये झाला होता.तो त्याच्या तरुण वयात ‘पीपल्स लिबरेशन गुरील्ला आर्मी’ या संघटनेच्या ‘क्रमांक एक च्या तुकडी’चा प्रमुख होता. ही तुकडी माओवाद्यांची आतापर्यंतची सर्वात हिंस्र तुकडी मानली जाते. तो सीपीआय (माओवादी) या समितीचा सर्वात तरुण सदस्य होता. तसेच तो या समितीचा बस्तर भागातील एकमेव सदस्य होता. अनेक भीषण हत्याकांडांमध्ये त्याने माओवाद्यांचे नेतृत्व केले होते. 2010 मध्ये छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे त्याच्या टोळीने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 76 सैनिकांचे हत्याकांड केले होते. तसेच, 2013 मध्ये त्याच्या नेतृत्वात त्याच्या टोळीने केलेल्या हल्ल्लात 27 निरपराध नागरीकही मृत्युमुखी पडले होते. या नागरीकांमध्ये काँग्रेसच्या 18 महत्वाच्या नेत्यांचा समावेश होता. 2021 च्या सुकमा-बिजापूर चकमकीत त्याचा हात होता. या चकमकीत 22 सुरक्षा सैनिक हुतात्मा झाले होते. त्याने एकंदर 26 लहान-मोठ्या भीषण नरसंहारांमध्ये आपल्या टोळीचे नेतृत्व केले होते. त्याच्यावर 50 लाख रुपयांचे इनाम होते. हिदमा याने आपल्या टोळीला लष्करी प्रशिक्षण दिले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्याच्या एन्काऊंटवर पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
संयुक्त कारवाईत हिदमा ठार
- आंध्र प्रदेश पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत ठार
- हिदमा याच्या टोळीने घडविली होती एकंदर 26 छोटी-मोठी हत्याकांडे
- त्याच्या सह त्याची पत्नी राजक्का आणि अन्य चार सहकाऱ्यांचा मृत्यू
- त्याला पकडून देण्यासाठी तीन राज्यांनी ठेवले होते 50 लाखाचे इनाम