कुख्यात इस्त्रायली ड्रग्ज डीलर अटाला याला रंगेहाथ अटक
8.70 लाखाचा ड्रग्ज जप्त : एएनसीने शिवोली येथे केली कारवाई
प्रतिनिधी/ पणजी
कुख्यात इस्रायली ड्रग्ज डीलर यानिव बेनाईम उर्फ अटाला उर्फ डुडू याला अमलीपदार्थ विरेधी विभागाने (एएनसीने) शिवोली येथे केलेल्या कारवाईत रंगेहाथ अटक केली. तो राहत असलेल्या भाड्याच्या घरातून 50 ग्रॅम कोकेन आणि 110 ग्रॅम चरस मिळून तब्बल 8 लाख 70 हजार ऊपये किमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. तसेच, 40 हजार ऊपये रोख रक्कमही त्याच्या ताब्यातून जप्त केली आहे.
अटाला गेल्या कित्येक महिन्यापासून एएनसीच्या रडारवर होता. पोलिसांनी गुप्तचर यंत्रणेचा वापर करून मिळविलेल्या माहितीनुसार एएनसी अधिकाऱ्यांनी शिवोली येथील अटालाच्या भाड्याने घेतलेल्या निवासस्थानी छापा मारला आणि त्याच्या ताब्यातील कोकेन, चरस आणि रोख रक्कम 40 हजार ऊपये जप्त केली. त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करून त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
आश्चर्य म्हणजे अटालाच्या ताब्यातील ड्रग्जसह पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यानिव बेनाईम उर्फ अटाला याला 2010 साली आणि त्यानंतर 2019 साली हणजूण पोलिस स्थानकात नोंदवलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विभागाने शिवोली येथे छाप्यादरम्यान मोठे यश मिळविले आहे आणि अटाला याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ही कारवाई एएनसी अधीक्षक टिकम सिंह (आयपीएस) तसेच उपनिरीक्षक नेरलॉन अल्बुकर्क, निरीक्षक सजीत पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीनदयालनाथ रेडकर, पोलिस कॉन्स्टेबल गौरीश गालतेकर, सुमित मुटकेकर, सायराज नाईक, राहुल गावस, विशाल शितोळे, महिला कॉन्स्टेबल्स स्नेहा साळवी, सीमा आर्परकर आणि वाहनचालक कुंदन पटेकर यांनी पंचांच्या उपस्थितीत केली . एएनसी पोलिस पुढील तपास करीत आहेत.