कुख्यात गुंड जोगिंदर ग्योंग दिल्ली पोलिसांच्या ताब्यात
फिलीपिन्समधून भारतात आणण्यात यश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कुख्यात गुंड जोगिंदर ग्योंगला दिल्लीतील एसटीएफने अटक केली आहे. त्याला फिलीपिन्समधून हद्दपार करण्यात आले असून रविवारी सकाळी भारतात आणण्यात आले. तो अनेक प्रकरणांमध्ये भारतीय तपास यंत्रणांना हवा होता. भारतात त्याच्याविरुद्ध दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे रविवारी सकाळी भारतात आणल्यानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होताचा त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
जोगिंदर ग्योंग हा कुख्यात गुन्हेगार सुरेंद्रचा भाऊ आहे. सुरेंद्र ग्योंग हा गेल्यावर्षी एका चकमकीत मारला गेला होता. जोगिंदर याने तीन वर्षांपूर्वी भारतातून पळून गेला होता. गेल्या दोन वर्षांपासून तो फिलीपिन्समध्ये राहत होता. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) 25 ऑक्टोबर 2024 रोजी इंटरपोलकडून जोगिंदर ग्योंगविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. या नोटिसीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांच्या कार्यवाहीनुसार पुढील प्रक्रिया राबविण्यात आली. तसेच जोगिंदर या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी कायदा अंमलबजावणी संस्थांना योग्य सूचनाही पाठवण्यात आल्या होत्या, असे एजन्सीच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे.