अट्टल गुन्हेगार गजाआड
मसूर :
सातारा व सांगली जिह्यातील विविध पोलीस ठाण्यांत तब्बल 28 गुन्हे दाखल असलेला आणि शिरोली पोलीस ठाणे (जि. कोल्हापूर) येथे नोंद असलेल्या गंभीर गुह्यातील संशयित पसार होता. मसूर पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात सचिन निवास साळुंखे (वय 37, रा. पेठ नाका, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) हा अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या सापळ्यात अडकला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मसूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांना मंगळवारी साडेदहाच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की, अट्टल गुन्हेगार सचिन साळुंखे हा घोलपवाडी (ता. कराड) परिसरात येणार आहे. त्यांनी तत्काळ दोन पथके तयार करून ती रवाना केली. मसूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली. त्यांना घोलपवाडीतील डोंगरकड्याजवळील तळ्dयाकाठी एक संशयित इसम आढळला. चौकशीत सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला विश्वासात घेऊन कसून विचारपूस केली असता त्याने स्वत:चे नाव सांगितले. गुन्हेगारी कुंडली तपासली असता सचिन निवास साळुंखे हा गंभीर गुह्यातील पसार संशयित असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांना फसवून अटकेपासून बचाव करण्यासाठी तो घोलपवाडीत लपून बसल्याचेही त्याने कबूल केले. मसूर पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले व शिरोली पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी मसूर येथे येऊन संशयित सचिन साळुंखे याचा ताबा घेतला.
ही कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व कराड उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत पो. हवालदार महेश लावंड व संजय काटे यांचा विशेष सहभाग होता.