मडकईकर यांच्या आरोपाबाबत ‘एसीबी’च्या अधीक्षक-निरीक्षकांना नोटिसा
पणजी : भाजप नेते तथा माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केलेल्या लाचखोरीच्या आरोपाबाबत भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी ) काहीही हालचाली न केल्याबाबत पणजी येथील प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाने एसीबीच्या पोलिस अधीक्षक आणि निरीक्षकांना नोटिसा पाठवल्या आहेत. पुढील सुनावणी 19 एप्रिल रोजी होणार आहे. मडकईकर यांनी नुकतेच आपली एक फाईल मंजूर करण्यासाठी एका मंत्र्याने 15 ते 20 लाख ऊपये लाच घेतल्याचे म्हटले होते. मडकईकरांच्या या आरोपमुळे खळबळ माजली आहे. मडकईकर यांनी केलेल्या लाचखोरीच्या या आरोपाबाबत भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागात सांताक्रूझचे माजी सरपंच तथा पंच इनासियो परेरा, काँग्रेसचे नेते जॉन नाझारेथ मिळून आठजणांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर कार्यवाही न केल्याने काशिनाथ शेट्यो यांनी पणजी येथील सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर काल बुधवारी सुनावणी झाली. यावेळी भारतीय न्याय संहितेच्या कलम-175 (3) नुसार पोलिस आपले काम करण्यास कुचराई करते, त्यावेळी हस्तक्षेप करण्याचा न्यायालयाला अधिकार असल्याचा दावा याचिकादारांतर्फे करण्यात आला. त्यानंतर सत्र न्यायालयाने एसीबीचे पोलिस अधीक्षक व निरीक्षकांना नोटिसा पाठवण्याचा आदेश दिला आहे.