महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीयांना लेबनॉन सोडण्याची सूचना

07:00 AM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘सुटका योजना’ तयार करण्यासंबंधी उच्च पातळीवर केला जात आहे विचार

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

मध्यपूर्वेतील अस्थिर परिस्थिती पाहता लेबनॉनमध्ये असलेल्या भारतीयांनी त्वरित तो देश सोडावा, अशी सूचना भारत सरकारने केली आहे. तसेच सरकार तेथील भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी योजना तयार करण्यासंदर्भात उच्च स्तरावरुन विचार करीत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. सध्या इस्रायल आणि लेबेनॉनमधील हिजबुल्ला ही संघटना यांच्यात भीषण संघर्ष होत आहे. इस्रायलने या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडण्याचा निर्धार केला असून सातत्याने हिजबुल्लाच्या स्थानांवर हल्ले केले जात आहेत. आतापर्यंत या हल्ल्यांमध्ये 1 हजारांहून अधिकांचा बळी गेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या देशातील वातावरण शांततेने राहण्यास योग्य नाही. परिणामी, भारतीयांनी हा देश त्वरित सोडावा आणि संभाव्य धोका टाळावा, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

प्रवास टाळा

ज्या भारतीयांना लेबेनॉनमध्ये जायचे आहे, त्यांनी त्यांची योजना टाळावी. तसेच जे भारतीय यापूर्वीच या देशात गेलेले आहेत, त्यांनी लवकरात लवकर परतण्याची योजना करावी. तसे न केल्यास त्यांना धोका निर्माण होऊ शकतो, असे भारत सरकारच्या सूचनापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या या देशात 3,000 हून अधिक भारतीय असावेत असे अनुमान आहे. या सर्वांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी काय करता येईल, यावर केंद्र सरकार विचार करीत आहे.

पहिलेच सूचनापत्र

लेबेनॉनमध्ये इस्रायल-हिजबुल्ला संघर्षाचा प्रारंभ झाल्यापासून प्रथमच भारताने असे सूचनापत्र प्रसारित केले आहे. इस्रायल दक्षिण लेबेनॉनवर सातत्याने मोठे हल्ले करीत आहे. याच भागात हिजबुल्लाचा मोठा प्रभाव असून या संघटनेला इराणचे पाठबळ आहे. गाझा पट्टीत हमास आणि दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्ला या दोन दहशतवादी संघटना इस्रायलवर टपून बसल्या असून त्यांना अरब भूमीत  इस्रायलचे अस्तित्व नको आहे. या दोन्ही संघटनांना नेस्तनाबूत केल्याशिवाय या भागात स्थायी शांतता निर्माण होणार नाही, असे इस्रालयाचे म्हणणे आहे.

विमानसेवा विस्कळीत

लेबनॉनची राजधानी बैरुट आणि भारत यांच्यातील विमानसेवा गेल्या काही आठवड्यांमध्ये कित्येकदा विस्कळीत झाली आहे. अनेक विमान उ•ाणे दोन्ही बाजूंकडून रद्द केली गेली आहेत. त्यामुळे तेथील भारतीयांची सुटका समुद्र मार्गाने करता येईल काय, यावरही भारत सरकार विचार करीत आहे. यासाठी भारताला नौदलाचे सहकार्य घ्यावे लागणार असून नौदल अधिकाऱ्यांची चर्चा केली जात आहे. फेबुवारी 2011 मध्येही असे सुटका अभियान करण्यात आलेले होते. त्यावेळी नौदलाच्या चार नौकांचा उपयोग करण्यात आला होता आणि 6 हजारांहून अधिक भारतीयांची या देशातून नौदलाने सुटका केली होती. यंदाही हाच मार्ग अवलंबिला जाण्याची शक्यता जास्त असून येत्या काही दिवसात असे अभियान हाती घेतले जाऊ शकते. तेथींल भारतीयांनीही तशी मागणी केलेली आहे.

इस्रायलचा पुन्हा दणका

बुधवार आणि गुरुवार असे सलग दोन दिवस इस्रायलने लेबनॉनच्या दक्षिण भागात तीव्र हल्ले चढविले. अमेरिकेने दोन्ही बाजूंना 21 दिवसांची शस्त्रसंधी करा अशी सूचना केली होती. तथापि, ती दोन्ही बाजूंनी मानल्याचे दिसून येत नाही. अमेरिकेने सूचना दिल्यानंतरही दोन्ही बाजूंनी हल्ले होतच आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये हिजबुल्लाने 200 ते 300 अग्निबाण आणि ड्रोन्सचा उपयोग केला. काही अग्निबाण थेट इस्रायलची पूर्वीची राजधानी तेल अविववरच आदळली होती. तथापि, यामुळे इस्रालयची मानवहानी मात्र विशेष झालेली नव्हती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article