शिमल्यातील बेकायदा मशिदीला नोटीस
वृत्तसंस्था / शिमला
हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील संजौली मशिदीच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी उग्र निदर्शने झाल्यानंतर आता शिमला महानगर पालिकेने या मशिदीच्या व्यवस्थापनाला नोटीस पाठविली आहे. या मशिदेचे अवैध बांधकाम दोन दिवसांमध्ये स्वत:हून पाडा. अन्यथा महापालिकेला ते पाडवावे लागेल असे नोटीसीत स्पष्ट करण्यात आले आहे. गुरुवारी मशिदीच्या व्यवस्थापनाने स्वत:च अवैध बांधकाम पडण्याची तयारी दर्शविली होती. पण तशा हालचाली केल्या नव्हत्या. आता प्रशासनाने नोटीस दिल्याने बांधकाम पाडवावे लागणार आहे.
शिमल्यातील मशिदीप्रमाणेच याच राज्यातील मंडी येथील मशीदही वादग्रस्त ठरली आहे. या मशिदीच्या व्यवस्थापनानेही सरकारी जागेवर अतिक्रमण करुन वाढीव बांधकाम केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. शुक्रवारी या मशिदीवरही अनेक स्थानिक संघटनांनी प्रचंड मोर्चा काढून निदर्शने केली. पोलिसांनी निदर्शकांवर अश्रूधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला. तथापि, संतप्त जमावाने निदर्शने चालूच ठेवली. या निदर्शनांमध्ये हजारो संतप्त नागरीकांनी भाग घेतला. मशिदींच्या आधाराने बांगला देशी घुसखोर आणि रोहिंग्या मुस्लीमांची संख्या वाढविली जात असून स्थानिक लोकसंख्येचा समतोल बिघडविण्याचे कारस्थान होत असल्याचा आरोप स्थानिक संघटनांनी केला आहे.