कडसगट्टी येथील शेतकऱ्यांना जमीन खाली करण्याची नोटीस
बैलहोंगल तालुक्यातील शेतकऱ्यांचे निवेदन
बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील कडसगट्टी येथील शेतकऱ्यांना तहसीलदार कार्यालयाकडून आपण कसत आलेली जमीन सरकारी असून ती ताबडतोब खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच जमीन न सोडल्यास संबंधितांवर फौजदारी खटला दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र शेतकरी सदर जमीन गेल्या 46 वर्षांपासून कसून उदरनिर्वाह करत आहेत. जर काढून घेतल्यास आम्ही रस्त्यावर येणार आहोत. यासाठी आम्हाला न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
कडसगट्टी येथील सर्व्हे क्र. 74 मधील शेती अर्जुन पाटील, गिरीमल्लप्पा पाटील, मडिवाळप्पा पाटील, रामप्पा पाटील, बसप्पा कुरबगट्टी, अर्जुन कुसोजी, शंक्रप्पा कुसोजी हे शेतकरी गेल्या 46 वर्षांपासून शेती पिकवत आहेत. याद्वारे ते आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवत आहेत. मात्र बैलहोंगल तहसीलदारांनी नोटीस बजावून सदर शेतजमीन सरकारी असून तुम्ही ती 7 दिवसांच्या आत खाली करावी. जर खाली न केल्यास तुमच्याकडून कायद्यानुसार दंड वसूल करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून याची सखोल माहिती घ्यावी. यानंतर योग्य कारवाई करून आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली.