"आपला बझार"ला अन्न व औषध प्रशासनाचा दणका
वैध अन्न परवाना नसल्याने व्यवसाय बंदची नोटीस.
कुडाळ /शहर वार्ताहर
चार दिवसांपूर्वीच कुडाळ येथे सुरु करण्यात आलेल्या 'आपला बझार" ची अन्न व औषध प्रशासना (एफडीए ) मार्फत तपासणी करण्यात आली असता, वैध अन्न परवाना नसल्याचे आढळले. बेकायदेशीरपणे हा व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार आमच्या तपासणीत उघड झाला. त्यामुळे विनापरवाना अन्न व्यवसाय सुरू ठेवणे हा गुन्हा आहे.काही परवाने नसल्याने व्यवसाय बंदची नोटीस सदर बझारला बजावण्यात आली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे (कुडाळ-वेंगुर्ले ) चे अन्नसुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. चार दिवसापूर्वीच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे या आपला बझारचे मोठ्या दिमाखात उदघाटन करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या 48 तासांत अन्न व औषध प्रशासन विभागाने या बझारवर धाड टाकली आणि दणका दिला. शुक्रवारी सायंकाळी उशिरा या विभागाने धाड टाकल्याने कुडाळ शहरात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर या कारवाईबाबत अन्न सुरक्षा अधिकारी श्री. चंदनशिवे यांनी कुडाळ - एमआयडीसी येथे आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.
श्री. चंदनशिवे म्हणाले,आपल्याला याबाबत माहिती मिळताच आपण व आपले सहकारी श्री. गावित यांनी आपला बझारची प्रत्यक्ष तपासणी केली. या तपासणीदरम्यान स्टोअरचे मालक श्री.नाईक उपस्थित नव्हते आणि त्यांनी आपली पूर्ण माहितीही डिस्प्ले केली नव्हती. त्यामुळे घटनास्थळी हजर असलेले स्टोअर मॅनेजर अमोल सुतार यांच्या उपस्थितीतच सर्व कायदेशीर कारवाई पार पाडण्यात आली. त्यांच्याच नावे कलम 31 नुसार व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजाविण्यात आली.नियमानुसार ज्या व्यवसायाचे वार्षिक उत्पन्न दीड कोटी रु.च्यावर असते.त्यांना एफडीएकडून 'व्हॅलिड परवाना' घेणे अत्यंत बंधनकारक आहे. या स्टोअरच्या सांगण्यानुसार त्यांचा वार्षिक व्यवसाय दीड कोटीच्या वर जाणार होता, असे असूनही त्यांनी परवाना घेतला नव्हता. विनापरवाना अन्न व्यवसाय सुरू ठेवणे हा अन्न सुरक्षा कायदा कलम ३१ नुसार गंभीर गुन्हा असून कलम ६३ नुसार तो शिक्षेस पात्र आहे. त्यामुळे आपण 'व्यवसाय बंद' करण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. जोपर्यंत वैध अन्न परवाना मिळत नाही.तोपर्यंत स्टोअर उघडता येणार नाही, अशी नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे. केवळ परवान्याचीच नव्हे, तर ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेत स्टोअरमधील गुळाच्या साठ्यातील संशयावरून त्याचे नमुने घेतले.सदर नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल लवकरच येणार असल्याचे त्यांनी सांगितले.