एकाच दिवशी तब्बल 1524 वाहनचालकांना नोटिसा जारी
पणजी : राज्यात बेशिस्त वाहतूक वाढत असल्याने त्याविरुद्ध वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविली जात आहे. त्या अंतर्गत वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता वाहन चालविणाऱ्या 1 हजार 524 वाहनचालकांना दंडाच्या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. मंगळवारी वाहतूक नियम मोडणाऱ्यांना 658 चालकांना चलन देण्याबरोबरच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणखी 1524 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी ठिकठिकणी वाहतूक पोलिस अधिकारी तैनात असतात.
यापैकी काही अधिकारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावतात. जे वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर पोलिसांचा डोळा चूकवून पळण्याचा प्रयत्न करतात अशा वाहनचालकांचे पोलिस अधिकारी फोटो काढून त्यांना 133 कलमाखाली नोटिस जारी करतात. वाहनचालकाने संबंधीत वाहतूक विभागाच्या कार्यालयात जाऊन दंड भरावा लागेल. 15 दिवसांच्या आत दंड न भरल्यास प्रकरण न्यायालयातपर्यंत जाते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडाला सामोरे जावे लागेल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी ’एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिला आहे.