हिंडनबर्ग रिसर्चला सेबीकडून नोटीस
अदानी समुहावर आरोप करणारी अमेरिकन फर्म
नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
अमेरिकन फर्म हिंडनबर्ग रिसर्चला भारतातील बाजार नियामक सेबीकडून 46 पानांची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मागील वर्षी जानेवारीमध्ये हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर स्टॉक मॅनिप्युलेशन तसेच मनी लॉन्ड्रिंगचे आरोप केले होते. या आरोपांप्रकरणी सेबीने आता हिंडनबर्गला नोटीस बजावली आहे. हिंडनबर्गने नियमांचे उल्लंघन केले असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. हिंडनबर्गच्या अहवालात लोकांची दिशाभूल करण्यासाठी काही चुकीचे वक्तव्यं सामील होती असा आरोप सेबीने केला आहे.
आमच्या विचारानुसार सेबीने स्वत:च्या जबाबदारीची उपेक्षा केली आहे. फसवणूक करणाऱ्यांपासून गुंतवणूकदारांचे रक्षण करण्याऐवजी फसवणूक करणाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी सेबी अधिक प्रयत्न करत असल्याचे वाटतेय असा दावा हिंडनबर्गने नोटीसच्या पार्श्वभूमीवर केला आहे.
सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची अदानी समुहाला गुप्त सहाय्य जानेवारी 2023 मध्ये आमचा अहवाल प्रकाशित झाल्यावर जवळपास त्वरित सुरू झाले होते. सेबीने पडद्याआड ब्रोकसर्वर अदानींच्या समभागांमध्ये शॉट पोझिशन्सला क्लोज करण्यासाठी दबाव टाकला होता. यामुळे खरेदीसाठी दबाव तयार झाला आणि महत्त्वपूर्ण काळात अदानी समुहाच्या समभागांना मदत मिळाल्याचा आरोप हिंडनबर्गने केला आहे.
जनता आणि सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी चौकशीसाठी दबाव आणल्यावर सेबी अडखळत असल्याचे दिसून आले. सर्वोच्च न्यायालयातील केस रिकॉर्डनुसार एफपीआयज फंड देणारे अदानी समुहाशी संबंधित नसल्याचे दाखवून देण्यास सेबी असमर्थ आहे. नंतर सेबीने पुढील चौकशी करण्यास असमर्थ असल्याचा दावा केल्याचे हिंडनबर्ग रिसर्चकडून म्हटले गेले.
आरटीआय अर्ज करणार
सेबीच्या प्रक्रियेविषयी आम्ही अधिक जाणून घेऊ इच्छितो. अदानी आणि हिंडनबर्ग दोन्ही प्रकरणी काम केलेल्या सेबीच्या कर्मचाऱ्यांची नावे जाणून घेण्यासाठी आम्ही आरटीआय अर्ज दाखल करणार आहोत. आम्ही सेबी आणि अदानी आणि त्यांच्या विविध प्रतिनिधींच्या बैठका आणि कॉल्सचा तपशील देखील मागणार आहोत असे हिंडनबर्ग रिसर्चने म्हटले आहे.