विकिपीडियाला सरकारकडून नोटीस
चुकीची माहिती प्रसारित करण्याचे प्रकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत सरकारने विकिपीडियाला नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये मागील महिन्यात त्याच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारी आणि पक्षपात यासारख्या गोष्टींविषयी उल्लेख आहे. विकिपीडियाला मध्यस्थाऐवजी प्रकाशक का मानले जाऊ नये असे या नोटीसमध्ये म्हटले गेले आहे.
तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने देखील एशियन न्यूज इंटरनॅशनलच्या पेजला चुकीच्या पद्धतीने एडिट केल्याप्रकरणी विकिपीडियाला फटकारले आहे. जर कुणाला भारत पसंत नसल्यास तो देश सोडू शकतो असे उच्च न्यायालयाने विकिपीडियाला उद्देशून म्हटले होते.
कुठल्याही विकिपीडिया पेजला चुकीच्या पद्धतीने एडिट केले गेल्यास आणि यात कंपनी साथ देत असल्यास हे पूर्णपणे चुकीचे आहे. विकिपीडिया स्वत:ला मध्यस्थ संबोधितो, मग यात कंपनीला काय समस्या होत आहे? जर कुठल्याही गोष्टीला चुकीचे एडिट करण्यात आले असेल तर विकिपीडियाने अजिबात पाठराखण करू नये असे न्यायाधीश सुब्रमण्यम प्रसाद यांनी सुनावले होते.
एएनआयच्या विकिपीडिया पेजला एडिट करून ते सरकारचे प्रोपेगैंडा टूल असल्याचे लिहिले होते. या पेजवर अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने एडिट करण्यात आल्या होत्या, यामुळे हा वाद निर्माण झाला होता. एएनआयच्या विकिपीडिया पेजला चुकीच्या पद्धतीने एडिट करणाऱ्याचे नाव जाहीर केले जावे असा निर्देश न्यायालयाने दिला होता. तर विकिपीडियाने या निर्देशाचे पालन करण्यास नकार दिला होता.
2001 मध्ये विकिपीडियाची सुरुवात झाली होती. जिमी वेल्स लॅरी सेंगर याचे संस्थापक होते. 2003 मध्ये हिंदीतही विकिपीडिया लाँच करण्यात आला होता. दर महिन्याला सुमारे 1.7 अब्ज वापरकर्ते माहितीसाठी विकिपीडियाचा वापर करतात. या वापरकर्त्यांना कंटेंटला एडिट करण्याचीही सुविधा मिळते, यामुळे अनेकदा लोक येथे चुकीच्या गोष्टीही एडिट करत असतात.