दक्षिणमुखी हनुमान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
कळंबा :
दक्षिणमुखी हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यावर्धिनी शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित श्रीमती आनंदीबाई ना. सरदेसाई हायस्कूल, सळोखेनगर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमाअंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्या वाटप करण्यात आल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात मोठा हातभार लागणार आहे. ट्रस्टने दाखवलेली ही सामाजिक जाणिव निश्चितच कौतुकास्पद आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ट्रस्टचे सागर शेटे, शिवाजी चौगुले, विवेकानंद जनवाडे, प्रेमचंद गाठ, चंद्रकांत माने, दिनकर जगदीश, चव्हाण, शिवाजी केसरकर, दशरथ कुपेकर, आदिनाथ पाटील आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम कोपार्डेकर आणि उपाध्यक्षा सुधा कोपार्डेकर यांनी ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम हे समाजप्रबोधनाचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सरिता भोसले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार वंदना पाटील यांनी मानले. या ट्रस्ट मार्फत भविष्यात अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा मानस ट्रस्टने व्यक्त केला आहे.