बंगालच्या उपसागरात नोटॅम जारी
अग्नि-4 क्षेपणास्त्राच्या परीक्षणाची शक्यता : इशारा 9 मेपर्यंत असणार लागू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत सरकारने बंगालच्या उपसागरात दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्र परीक्षणासाठी नोटॅम (नोटीस टू एअरमॅन) जारी केला आहे. हा इशारा 9 मेपर्यत लागू राहणार आहे. नोटॅममध्ये सुमारे 3550 किलोमीटर अंतरापर्यंत धोक्याचा भाग घोषित करण्यात आला आहे. यादरम्यान अग्नि-4 क्षेपणास्त्राचे परीक्षण केले जाऊ शकते, असे संरक्षण तज्ञांचे मानणे आहे.
हे परीक्षण ऑपरेशन सिंदूरला वर्ष पूर्ण होण्याच्या आसपास होत आहे. यामुळे हे परीक्षण केवळ तांत्रिक नव्हे तर रणनीतिक संदेश देणार असल्याचे मानण्यात येत आहे. अग्नि-4 भारताच्या महत्त्वपूर्ण क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. हे एक इंटरमीडियट रेंज बॅलेस्टिक मिसाइल (आयआरबीएम) आहे.
क्षेपणास्त्रांची वैशिष्ट्यो..
मारक पल्ला : 3500 ते 4000 किलोमीटर
वजन : जवळपास 17 टन
लांबी : सुमारे 20 मीटर
इंधन : सॉलिड फ्यूल (ठोस इंधन)
टप्पे : दोन टप्पेयुक्त क्षेपणास्त्र
वॉरहेड : 1000 किलोग्रॅमपर्यंत आण्विक किंवा पारंपरिक अस्त्र वाहून नेणार
क्षमता : अत्यंक अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता, मोबाइल लाँचरने डागता येते.
अग्नि-4 भारताच्या आण्विक ट्रायडचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. हे क्षेपणास्त्र रेल्वे आणि रस्ते दोन्ही ठिकाणांवरून डागता येते. यामुळे शत्रूला हे वेळेपूर्वीच नष्ट करणे अत्यंत अवघड असते.
नोटॅम जारी का?
नोटॅम जारी करत भारताने वैमानिक आणि जहाजांना निर्धारित क्षेत्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. हे क्षेत्र बंगालच्या उपसागरात असून जे अग्नि-4 सारख्या क्षेपणास्त्रासाठी उपयुक्त आहे. फ्लाइट पाथ आणि धोकायुक्त क्षेत्राचे अंतर अग्नि-4 च्या क्षमतेशी मिळतेजुळते आहे.
ऑपरेशन सिंदूरला वर्ष पूर्ण
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मे 2025 मध्ये भारताकडून पाकिस्तानातील दहशतवादी अ•s नष्ट करण्यात आले होते. आता बरोबर एक वर्षानंतर हे क्षेपणास्त्र परीक्षण होतेय. संरक्षण मंत्रालयाने याला अधिकृत स्वरुपात ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीशी जोडले नाही, पण हे परीक्षण भारताच्या सैन्यतयारी अणि मजबूतीचा संदेश देणार असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.
क्षेपणास्त्र क्षमता वाढतेय
अलिकडच्या काळात भारताने स्वत:च्या क्षेपणास्त्र परीक्षणांना वेग दिला आहे. अग्नि श्रेणीसोबत के-4 (पाणबुडीतून डागले जाणारे) हायपरसोनिक क्षेपणास्त्र एलआरएएसएचएम आणि ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राच्या 800 किलोमीटर मारक पल्ला असलेल्या वर्जनचे परीक्षण होणार आहे. ब्राह्मोसचे नवे वर्जन 2027 पर्यंत भारतीय सैन्यात सामील होणार आहे.