फितच नव्हे नाकही कापले
नकली पिझ्झा हटचे उद्घाटन : पाक संरक्षणमंत्र्यांनी करविली फजिती
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी नकली ‘पिझ्झा हट’चे उद्घाटन केले आणि मूळ कंपनीने त्वरित यासंबंधीचा दावा फेटाळला. ख्वाजा आसिफ यांनी सियालकोट कँटोन्मेंट भागात एका आउटलेटची रिबन कापली, ज्याला पिझ्झा हट संबोधिण्यात आले. पण काही तासांनी खऱ्या पिझ्झा हट पाकिस्तानने वक्तव्य जारी करत हे आउटलेट पूर्णपणे अनधिकृत आणि बनावट असल्याचे स्पष्ट केले.
पाकिस्तानातील ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पाकिस्तानचे लोकच या घटनेवरून स्वत:च्या सरकारची थट्टा करत आहेत. इतक्या मोठ्या आयोजनात अशी मोठी चूक कशी झाली असा प्रश्न लोक आता विचारू लागले आहेत.
सियालकोट कँटोन्मेंटमध्ये हा कार्यक्रम धूमधामात पार पडला. पाकिस्तानी संरक्षणमंत्री आसिफ यांनी फित कापली आणि फोटो-व्हिडिओत आनंदाच्या पोझही दिल्या. या ठिकाणी पिझ्झा हटचा प्रख्यात लाल छतयुक्त लोगो आणि ब्रँडिंग दिसून येत होते. आयोजकांनी याला नवे पिझ्झा हट आउटलेटच्या स्वरुपात सादर केले. परंतु काही वेळातच सत्य समोर आले.
संबंधित आउटलेट पिझ्झा हट पाकिस्तानच्या अधिकृत यादीत समाविष्ट नसल्याचे ऑनलाईन युजर्सच्या लक्षात आहे. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यावर खऱ्या कंपनीला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. सियालकोट कँटोन्मेटमध्ये खुले झालेले हे आउटलेट अनधिकृत आहे. कंपनीचे याच्याशी कुठलेच देणेघेणे नाही. हा आउटलेट बनावट पद्धतीने आमचे नाव आणि ब्रँडिंगचा वापर करत असल्याचे पिझ्झा हट पाकिस्तानने एक वक्तव्य जारी करत स्पष्ट केले आहे.
हे आउटलेट पिझ्झा हटची आंतरराष्ट्रीय रेसिपी, क्वालिटी प्रोटोकॉल, फूड सेफ्टी किंवा ऑपरेशनल स्टँडर्ड्सचे पालन करत नाही असे म्हणत कंपनीने संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करत ट्रेडमार्कचा दुरुपयोग रोखण्याची मागणी केली आहे.