For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वायुतळच नव्हे, त्यांच्या गर्वावरही आघात

06:58 AM May 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
वायुतळच नव्हे  त्यांच्या गर्वावरही आघात
Advertisement

पंजाबमधील आदमपूर वायुतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गर्जना : पकिस्तानला सज्जड इशारा

Advertisement

वृत्तसंस्था / आदमपूर (पंजाब)

‘सिंदूर’ अभियानाच्या माध्यमातून पाकिस्तानचे केवळ वायुतळच नव्हे, तर त्याचा गर्वही उद्ध्वस्त झाला आहे. पाकिस्तानने यापुढे जर पुन्हा दहशतवादी हल्ला केला, तर केवळ दहशतवादीच नव्हे, तर त्यांच्या या पाठीराख्या देशालाही सज्जड किंमत मोजावी लागल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वायुदलाच्या पंजाबमधील आदमपूर वायुतळावरुन केला आहे.

Advertisement

त्यांनी मंगळवारी या वायुतळाला भेट दिली. या भेटीमुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा आणि अपप्रचार उघडा पडला आहे. कारण हा वायुतळ उद्ध्वस्त केल्याची खोटी फुशारकी पाकिस्तानने चार दिवसांपूर्वी मारली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वायुतळाला भेट देऊन तो अत्यंत सुस्थितीत आणि सुरक्षित असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा नाचक्की झाली आहे.

वायुसैनिकांसमोर भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर वायुतळावर तेथील अधिकारी आणि वायुसैनिक यांच्यासमोर ओजस्वी भाषण केले. आपल्या पराक्रमामुळे भारताची मान अधिकच उंचावली आहे. भारत देशाची प्रतिष्ठा आपल्या या अतुलनीय कामगिरीमुळे झळाळून उठली आहे. भारतीय वायुदलाने पाकिस्तानचा प्रत्येक हल्ल्याचा प्रयत्न तर उधळून लावलाच, पण पाकिस्तानला लक्षात राहील असा धडाही शिकविला. हा दणका पाकिस्तानला अनेक दिवस लक्षात राहील. भारतीय सेनेच्या पराक्रमावर आमचा पूर्ण विश्वास आहे. हा विश्वास तुम्ही सिद्ध करुन दाखविला आहे. यासाठी देश तुमचा आभारी आहे, अशी भलावण त्यांनी भाषणात केली.

एस-400 समवेत छायाचित्र

भारताची एस-400 यंत्रणा नष्ट केल्याचा अपप्रचार पाकिस्तानकडून करण्यात आला होता. तथापि, तोही किती खोटा आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीही न बोलता दाखवून दिले आहे. आदमपूर वायुतळावर त्यांनी या एस-400 यंत्रणेसह आपले छायाचित्र काढून घेतले. त्यामुळे या यंत्रणेलाही काही हानी झालेली नसून पाकिस्तानचे दावे खोटे आहेत, हे आपोआपच सिद्ध झाले आहे.

पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा

आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला आहे. पुन्हा आमच्यावर दहशतवादी हल्ल्ल्याचे दु:साहस केलेत, तर तुमचा कणा मोडल्याशिवाय राहणार नाही, अशा अर्थाचा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला. पाकिस्तानला स्वत:ची प्रगती करायची असेल, तर त्याला दहशतवाद सोडावाच लागेल. त्याने दहशतवाद न सोडल्यास त्याचा विनाश अटळ आहे, असेही सूचक शब्दांमध्ये स्पष्ट करत त्यांनी पाकिस्तानला फटकार लगावली.

नवे तत्व प्रस्थापित

भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यास हे दहशतवादी जिथे असतील, तिथे घुसून त्यांचा खात्मा केला जाईल, हे नवे तत्व आता भारताने प्रस्थापित केले आहे. 7 मेच्या अभियानात पाकिस्तानचे 100 हून अधिक दहशतवादी ठार करण्यात आले. तसेच दहशतवाद्यांचे 9 तळ नष्ट करण्यात आले, अशी माहितीही त्यांनी दिली.

ड्रोन गरजेल ‘भारत माता की जय’

‘भारत माता की जय’ ही आपली घोषणा केवळ युद्धभूमीवरच नव्हे, तर सैन्यदलांच्या प्रत्येक अभियानात यापुढे गरजणार आहे. इतकेच नव्हे, तर आपले प्रत्येक ड्रोन आणि प्रत्येक क्षेपणास्त्र हाच जयघोष करीत शत्रूवर तुटून पडणार आहे, अशीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात केली आहे. हा नवा भारत असून तो आपल्यावरील कोणताही अत्याचार किंवा अन्याय कधीही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी भारताच्या सर्व शत्रूंना यावेळी दिला आहे.

भारतावर वक्रदृष्टी म्हणजे विनाश

जो कोणी भारताकडे वकृदृष्टीने पाहील, भारताची हानी करण्याचा प्रयत्न करेल, किंवा भारताची कुरापत काढण्याचा प्रयत्न करेल, त्याचा विनाश ठरलेला आहे, असा स्पष्ट संदेश या सिंदूर अभियानातून देण्यात आला आहे. साऱ्या जगाला भारताच्या सामर्थ्याची ही झलक दिसून आली आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

आदमपूर भेटीतून अनेक बाबी साध्य

ड आदमपूर येथील वायुतळाच्या भेटीमुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड

ड या वायुतळाची कोणतीही हानी झाली नसल्याचे या दौऱ्यामुळे झाले स्पष्ट

ड भारताची एस-400 यंत्रणा नष्ट केल्याचा पाकिस्तानाचा दावा पडला खोटा

ड पाकिस्तानला याहीपेक्षा मोठा हादरा तो न सुधारल्यास निश्चितच मिळणार

Advertisement
Tags :

.