बौद्धिक संपदा : कायदेशीर सुरक्षाकवच नव्हे, तर आर्थिक विकासाचे महाद्वार
दरवर्षी 26 एप्रिल हा दिवस जागतिक बौद्धिक संपदा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि 2000 मध्ये जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने याची सुरुवात केली. जेणेकरून पेटंट्स, कॉपीराइट, ट्रेडमार्क्स आणि डिझाइन्स हे आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम करतात याबाबत जागरूकता निर्माण केली जाईल. तसेच बौद्धिक संपदा हक्क नवोन्मेष आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
भारत ज्ञान-आधारित आर्थिक प्रारूपाकडे वाटचाल करत असल्यामुळे, देशाच्या नवोन्मेषी अर्थव्यवस्थेमध्ये बौद्धिक संपदेच्या भूमिकेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. बौद्धिक संपदा हक्क हे असे कायदेशीर साधन आहे, जे नवोन्मेषाचे संरक्षण करतात, संशोधनाला प्रोत्साहन देतात आणि अमूर्त मालमत्तेच्या व्यापारीकरणास सुलभ करतात. ज्या वातावरणात तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि डेटा हे आर्थिक घडामोडींचे आधारस्तंभ आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये भारताची नाविन्यपूर्ण परिसंस्था लक्षणीयरीत्या विकसित झाली आहे. माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण, जैवतंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि डिजिटल माध्यम यांसारख्या क्षेत्रांमधील वाढीमुळे बौद्धिक संपदेच्या निर्मितीत वाढ झाली आहे. पेटंट्स, ट्रेडमार्क्स, कॉपीराईट्स आणि डिझाइन हक्क यांच्या माध्यमातून अशा संपदेचे संरक्षण केल्याने त्यावरील अनन्य अधिकार सुनिश्चित होतात आणि तिचे व्यावसायिक मूल्य वाढते. अशा प्रकारे, बौद्धिक संपदा ही केवळ एक कायदेशीर सुरक्षाकवच म्हणूनच नव्हे, तर आर्थिक विकासासाठी एक उत्प्रेरक म्हणूनही कार्य करते.
सध्यातरी चीनचे वर्चस्व जागतिक नवसर्जनाच्या दृष्टीकोनातून एक वळणबिंदू दर्शवतो. चीनने आजवर सातत्याने संशोधन आणि विकासामध्ये केलेल्या मोठ्या गुंतवणुकीचे हे परिणाम आहेत. नवोन्मेष आणि सर्जनशीलता यामध्ये अमेरिका आपल्या सर्वोत्कृष्ठ शैक्षणिक पद्धतीमुळे जगात आघाडीवर आहे. नवतंत्रज्ञानात अमेरिकेची आघाडी राहिली आहे पण चीनची मुसंडी मात्र थक्क करणारी आहे. जपान, दक्षिण कोरिया आणि जर्मनी प्रगत अभियांत्रिकी आणि उत्पादनावर आधारित नवसर्जनाचे मजबूत केंद्र राहिले आहेत. भारताची सुरुवात संथ आहे कारण संशोधन आणि विकास यामध्ये आवश्यक त्या प्रमाणात गुंतवणूक होत नाही. जागतिक नवसर्जन स्पर्धा आता एका प्रदेश किंवा एका राष्ट्राबद्दल नाही. हे बहुध्रुवीय स्पर्धेत रूपांतरित झाले आहे, यूरोप आणि उत्तर अमेरिका अजूनही खेळात ठाम आहेत.
भारताने बौद्धिक संपदा हक्कांचे नियमन करणारी एक व्यापक कायदेशीर चौकट विकसित केली आहे. पेटंट कायदा 1970, ट्रेड मार्क्स कायदा 1999, कॉपीराइट कायदा 1957 आणि डिझाइन्स कायदा 2000 हे बौद्धिक संपदा संरक्षणाचा पाया आहेत. हे कायदे ट्रिप्स कराराअंतर्गत असलेल्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांशी सुसंगत आहेत. ही कायदेशीर चौकट हक्कांचे संरक्षण आणि सार्वजनिक हिताच्या विचारांमध्ये संतुलन साधते. उदाहरणार्थ, पेटंट कायद्यांतर्गत अनिवार्य परवान्याशी संबंधित तरतुदी अत्यावश्यक औषधांच्या उपलब्धतेचा प्रश्न सोडवतात. त्याचप्रमाणे, कॉपीराइट कायद्यांतर्गत योग्य व्यवहाराच्या तरतुदी ज्ञान आणि माहितीची उपलब्धता सुनिश्चित करतात. पेटंट, डिझाइन्स आणि ट्रेड मार्क्सचे नियंत्रक महासंचालक (कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स, डिझाइन्स अँड ट्रेड मार्क्स) यांसारखे नियामक प्राधिकरण बौद्धिक संपदा हक्कांच्या नोंदणी आणि प्रशासनावर देखरेख ठेवतात. उच्च न्यायालये आणि विशेष न्यायाधिकरणांसह न्यायिक मंच, हक्कांच्या उल्लंघनाशी आणि वैधतेशी संबंधित वादांवर निर्णय देतात.
बौद्धिक संपदा अमूर्त मालमत्तेचे मुद्रीकरण शक्य करून आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देते. व्यवसाय परवाना, फ्रँचायझिंग आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे महसूल मिळवण्यासाठी बौद्धिक संपदेचा उपयोग करतात. विशेषत: स्टार्टअप्स, बौद्धिक संपदेवर एक प्रमुख मालमत्ता म्हणून अवलंबून असतात. गुंतवणूकदार अनेकदा गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी बौद्धिक संपदा पोर्टफोलिओच्या सामर्थ्याचे मूल्यांकन करतात. एक मजबूत बौद्धिक संपदा धोरण मूल्यांकन वाढवते आणि निधी मिळवण्यास मदत करते. उत्पादन आणि अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये, डिझाइन संरक्षण आणि पेटंट्समुळे उत्पादनांच्या विकासामध्ये अनन्यतेची खात्री मिळते. व्यापारी चिन्हे ब्रँडची ओळख संरक्षित करून नाविन्यनिर्मितीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावतात. एक सशक्त ब्रँड बाजारपेठेत इतरांपासून वेगळे ठरवतो, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढतो. कॉपीराइट संरक्षणामुळे सॉफ्टवेअर कोड, चित्रपट, संगीत आणि साहित्यिक मजकूर यांसारख्या सर्जनशील कलाकृतींचे रक्षण सुनिश्चित होते.
भारतीय न्यायालयांनी बौद्धिक संपदेचे स्वरूप घडवण्यात आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नोव्हार्टिस एजी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स या खटल्यात, सर्वोच्च न्यायालयाने पेटंट कायद्याच्या कलम 3(ड ) अंतर्गत पेटंटपात्रतेच्या व्याप्तीचे परीक्षण केले. न्यायालयाने एका ज्ञात औषधाच्या सुधारित स्वरूपाला पेटंट संरक्षण नाकारले.‘एव्हरग्रीनिंग’ला प्रतिबंध व औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याची गरज अधोरेखित केली.
प्रा. डॉ. गिरीश नाईक