केवळ निष्काळजीपणा नसून गुन्हा : अमित पाटकर
पणजी : चोडण येथे फेरीबोट बुडण्याची घटना घडून आठवडाही उलटला नाही तोच बुधवारी कुंभारजुवा कालव्यात आणखी एक फेरीबोट भरकटण्याची घटना घडली असून या प्रकारासाठी काँग्रेसपक्षाने सरकारवर जोरदार टीका केली आहे. ही आपत्ती हा केवळ निष्काळजीपणा नसून एक गुन्हा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी या घटनेसाठी तीव्र संताप व्यक्त केला. चोडण येथे बुडालेल्या फेरीबोटीसाठी बुधवारी आम्ही निदर्शने करत होतो. त्याच दरम्यान, कुंभारजुवे कालव्यात फेरीबोट भरकटण्याची घडना घडली. मात्र केवळ नशिबानेच त्यातील प्रवासी बचावल्याचे ते म्हणाले. या घटना पाहता भाजप सरकार लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे सरकार अनेक गावांसाठी एकमेव साधन असलेल्या फेरी वाहतूक व्यवस्थेची मूलभूत सुरक्षा देखील सुनिश्चित करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
कुंभारजुवे कालव्यात भरकटलेल्या फेरीबोटीचा व्हायरल झालेला व्हीडिओ पाहताना अंगावर शहारे येतात. ही फेरी भरकटून कालव्याच्या मध्यभागी पोहोचलेली असतानाच तेथून जाणाऱ्या बार्जच्या चालकाचे प्रसंगावधान आणि प्रवाशांचे सुदैव यामुळेच त्या बार्जला धडकण्यापासून बचावली, असे पाटकर यांनी म्हटले आहे. आता या प्रकाराची जबाबदारी एकतर मुख्यमंत्री किंवा नदी परिवहन मंत्र्यांनी घ्यावी किंवा या दुर्घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे. तसेच वारंवार होणाऱ्या बिघाडांची सखोल फौजदारी चौकशी व्हावी, सर्व फेरीबोटी, रॅम्प, टर्मिनल आणि संबंधित पायाभूत सुविधांचे संपूर्ण सुरक्षा ऑडिट करण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या सरकारकडे पीआरच्या नावाने स्टंटबाजी आणि भव्य कार्यक्रमांवर फालतू खर्च करण्यासाठी पैसे आहेत. मात्र जनतेच्या मूलभूत वाहतूक सुरक्षेसाठी एक पैसाही नाहीत का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. सरकारला हे शक्य नसेल तर सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे सांगताना श्री. पाटकर यांनी या सरकारला हा विश्वासघात गोव्यातील लोक माफ करणार नाही, असा इशारा दिला आहे.