एकही झोपडी तुटणार नाही : मोदी
केजरीवालांच्या आरोपावर पंतप्रधानांची स्पष्टोक्ती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच आरोप फेटाळले आहेत. भाजप दिल्लीत सत्तेवर आल्यास सर्व झोपड्या तोडून टाकणार असल्याचा दावा केजरीवालांनी केला होता. दिल्लीतील एकही झोपडी तोडली जाणार नाही तसेच कुठलीही योजना बंद केली जाणार नाही. ‘आप’दा वाले अफवा फैलावत असल्याचे पंतप्रधान मोदींनी रविवारी स्पष्ट केले आहे.
दिल्लीत भाजप सत्तेवर आल्यास एकही झोपडी तोडली जाणार नाही. भाजप मध्यमवर्ग आणि प्रामाणिक लोकांना मान देणारा पक्ष आहे. भारताच्या इतिहासात मध्यमवर्गासाठी सर्वात अनुकूल अर्थसंकल्प पहिल्यांदाच मांडण्यात आला आहे. पूर्वी अर्थसंकल्प ऐकल्यावर मध्यमवर्गाची झोप उडायची. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पाने लोकांना मोठा दिलासा दिला आहे. आता 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर शून्य करण्यात आला आहे. यामुळे मध्यमवर्गाच्या लोकांचे हजारो रुपये वाचणार असल्याचे मोदी म्हणाले.
पूर्वांचल आणि बिहारच्या बंधूभगिनींचे संदेश मला मिळत आहेत. हे संदेश मोदी हा पूर्वांचलमधून खासदार म्हणून निवडून आल्याने मिळत आहेत. कोविडच्या नावावर माझ्या पूर्वांचलच्या बंधूंना आप सरकारने दिल्लीतून हुसकावून लावले होते. तर भाजप सरकार पूर्वांचल आणि बिहारच्या लोकांना मदत करत राहणार आहे. यंदा दिल्लीत भाजप सरकार सत्तेवर येणार आहे. दिल्लीच्या ‘आपदा’ पक्षाने येथील 11 वर्षे वाया घालविली आहेत. आता भाजप दिल्लीची सेवा करणार असल्याचे मोदी म्हणाले.
यंदाचा अर्थसंकल्प मध्यमवर्गाचा खिसा भरणारा आहे. जवाहरलाल नेहरूंच्या काळात 12 लाखावर एक चतुर्थांश रक्कम कर म्हणून कापून घेतली जात होती. इंदिरा गांधींच्या काळात बारा लाख रुपयांवर 10 लाख रुपयांचा कर भरावा लागत होता. 10 वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात मोठा कर भरावा लागायचा. परंतु आता भाजप सरकारच्या काळात एक रुपयाही कर म्हणून द्यावा लागणार नसल्याचा दावा मोदींनी केला.
काँग्रेसचे सरकार केवळ स्वत:चा खजिना भरण्यासाठी कर लादत होते. परंतु भाजप सरकार लोकांसाठी खजिना खुला करत आहे. आता 12 ते 24 लाख रुपयांपर्यंतच्या कराचे प्रमाणही कमी करण्यात आले आहे. त्यांचे देखील 1 लाख 10 हजार रुपये वाचणार आहेत असे उद्गार मोदींनी काढले आहेत.