अपात्र बहिणीमध्ये एकही शासकीय महिला कर्मचारी नाही
रत्नागिरी :
राज्यभरात गाजत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांसोबतच काही अपात्र महिलांनीही घेतल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात अनेक शासकीय कर्मचारी महिलांनीही या योजनेचा लाभघेतल्याने आता या महिलांना योजनेतून वगळण्यात आले असून त्यांच्याकडून योजनेतून प्राप्त रकमेची परतफेड करुन घेण्यात येत आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय सेवेत असलेली एकही महिला योजनेत समाविष्ट नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात कोणत्याच महिलेकडून योजनेची परफेड करुन घेतली जाणार नाही. जिल्ह्यात तब्बल ४ लाख ७४ महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. या व्यतिरिक्त ७ हजार ७५३ महिलांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे. तसेच महिलांच्या नावावर चारचाकी वाहने असल्याने त्यांना वगळण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाकडून जिल्हा महिला बालविकास विभागाला चारचाकी वाहन नावावर असलेल्या महिलांची यादी देण्यात आली होती. या यादीनुसार पडताळणी करून योजनेतील १ हजार ३५० महिलांना वगळण्यात आले.
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या २हजार ७६२ महिला आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असलेल्या २ हजार २५४ महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे.
जिल्ह्यात शासकीय सेवेत असलेली एकही महिला लाडकी बहीण योजनेत आढळली नसल्याने कोणत्याही महिलेकडून योजनेसाठी दिलेल्या पैशांची परतफेड होणार नसल्याने याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.