ध्यान मंदिर नव्हे, कोल्हापूरचे हे अंतरंगच
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
इथेच आहे पण दिसत नाही, अशा अवस्थेतले महाव्दार रोडवरचे एक प्राचीन मंदिर. काल एका व्हिडिओतून समोर आले आणि आज असंख्य कोल्हापूरकरांचे पाय उत्सुकतेपोटी या मंदिराला लागले. नेहमी ओसंडून वाहणाऱ्या महाद्वार रोडवर काळाच्या ओघात ढिगाऱ्यावर ढिग चढत गेल्याने हे मंदिर पूर्ण नजरेआड झाले होते. केवळ त्याच्या दगडी चौकटीचा काही भाग वर दिसत होता. भुयार, चोरवाट, दारुगोळ्याचा खजिना अशा दंतकथांचा वेढा या मंदिराभोवती पडला होता. पण आज बऱ्यापैकी मंदिर खुले झाले. त्याचे प्राचीन अंतरंग लोकांनी पाहिले. व जुन्या कोल्हापूरचा परिसर कसा होता, याचे या मंदिराच्या रूपातून एक वास्तव कोल्हापूरकरांच्या समोर आले.
आज महाद्वार रोड व्यापाराचे एक मुख्य केंद्र आहे. कायम लखलखाट आहे. गर्दीचा तर बारा महिने महापूर. पण पूर्वी हा परिसर सरदार, मानकरी, संस्थान काळातील मोठ्या पदावरील व्यक्ती ज्येष्ठ अभ्यासू व्यासंगी अशा रहिवाशांचा होता. निंबाळकर वाडा, भोसले वाडा, चावराकर भोसले वाडा, नागपूरकर वाडा, जोशीराव वाडा, शुक्ल वाडा, उमराणीकर वाडा, पंडितराव वाडा, काझी वाडा, कडेकर वाडा, लाटकर वाडा अशी वाड्यांची रांगच होती. रँगलर नारळीकर, वैद्यराज दुधगावकर, नागावकर, हसबणीस, पंडितराव, राजोपाध्ये फलटणकर, मुजुमदार, राजाज्ञा, वाकणीस, कुलकर्णी, फलटणकर, गाडवे, क्षेत्रमाडे, प्रधान, सदलगेकर यांची ऐसपैस वाडेवजा घरे होती. अंबाबाईचा रथ या रस्त्यावरूनच थाटात निघायचा. अशा महाद्वारावर आता जेथे हर्ष ऑप्टिक्स आहे, त्या जागेत व बाजूलाही निंबाळकरांचा वाडा होता. त्याच्यामागे हे प्राचीन मंदिर आहे. ते काळाच्या ओघात अक्षरश: कचरा व खरमातीच्या ढिगाऱ्यात दडले होते. मंदिराच्या दगडी चौकटीचा थोडासा भाग बाहेरून दिसत होता. त्यामुळे भुयार, चोरवाटा, तोफगोळ्याचा खजिना म्हणून काही दंतकथाची जोड या ठिकाणाला मिळाली होती व नको त्या आख्यायिकाही उठत होत्या. पण निंबाळकर परिवाराने असे गाडलेले मंदिरही आपल्या हृदयात कायम जपले होते. ते दंतकथांना उत्तर देण्याच्या भानगडीत कधी पडत नव्हते. त्यांनी मंदिराची नोंद पुरातत्व विभागाकडेही केली आहे. काल, परवा काही निमित्ताने विक्रम निंबाळकर हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत या बाजूला गेले आणि त्यांच्या मित्राने व्हिडिओ चित्रीकरण केले. ते कोल्हापुरात व्हायरल झाले, पण त्यातही भुयार, चोरवाट अशीच दंतकथा जोडली गेली होती.
आज या मंदिराच्या ठिकाणी भेट दिली असता मंदिराच्या दगडी चौकटीवरचा ढिगारा बाजूला केला गेला आहे. आतले 16 खांबाचे हेमाडपंथी मंदिर खुले झाले आहे. मंदिरात मूर्ती नाही, पण मूर्ती ठेवली जाणारी चौकट आहे. मंदिराच्या छतावर 8 फूट लांबीच्या दगडी अखंड शिळा आहेत. मंदिर एकात एक दगड अडकवून म्हणजे अडक पद्धतीने बांधले आहे. ते ध्यानगृह असावे, असाही एक अंदाज आहे.
आज महाद्वार रोडवर बारा तास ओसंडून वाहणारी गर्दी, लखलखाटात उजळलेला रस्ता दिसत असला तरी कोल्हापूर शहर वसण्यापूर्वी किंवा त्या काळातील हे मंदिर असण्याची शक्यता आहे. शहर जसे वाढत गेले तसे हे मंदिर बाजूला पडत गेले. मंदिराला उंच उंच इमारतींनी घेरले आहे. त्यामुळे हे मंदिर म्हणजे पाच-सहाशे वर्षांपूर्वीचे कोल्हापूरचे अंतरंग जपतच आजही कसेबसे उभे आहे. ते काळाच्या ओघात ढिगाऱ्याखाली जरूर गेले होते. पण आता पुन्हा काळाचे एक एक थर बाजूला करत पुन्हा नव्याने जगासमोर आले आहे. कोल्हापूरकरांनी तर मुद्दाम पाहावे, असेच हे महाव्दार रोडवरचे ठिकाण आहे.
ध्यान मंदिर शक्यता...
या वास्तूच्या दगडी चौकटीवर तीर्थंकराचे एक भग्न शिल्प आहे. त्यामुळे जैन ध्यान मंदिर असण्याचीही शक्यता मंदिर रचना अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, मंदिराला 16 खांब व 9 चौकोन आहेत. गर्भ गृह नाही. अंतराळ नाही. त्यामुळे ते ध्यानमंदिरही असावे, अर्थात हा प्राथमिक अंदाज आहे.