जाती जनगणना नव्हे; सामाजिक-शैक्षणिक सर्वेक्षण
मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. सी. एम. कुंदगोळ : जि. पं. सभागृहात सर्वेक्षण विकास आढावा बैठक
बेळगाव : राज्य मागासवर्ग आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्वेक्षण करण्यात येत आहे. पण याचा जाती जनगणना म्हणून प्रचार करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून सर्वेक्षणाला जनगणना म्हणून माहिती देण्यात येत आहे. मात्र ही जाती जनगणना नसून एक व्यापक सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण आहे, असे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. सी. एम. कुंदगोळ यांनी सांगितले.
जि. पं. सभागृहात मंगळवारी आयोजित मागासवर्गीय आयोगाच्या सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणाच्या विकास आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सर्वेक्षणादरम्यान येणाऱ्या समस्या आणि आव्हाने, तसेच जनेतचा मिळणारा प्रतिसाद याबाबत चर्चा करण्यात आली. कुंदगोळ म्हणाले, सर्वेक्षणादरम्यान सुरुवातीच्या काळात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र संबंधित विभागाकडून त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात आली आहे. पोटजातीच्या रकाण्यात नोंदणी करताना तांत्रिक अडचणींबद्दल काही तक्रारी आल्या असून त्यांचेही निवारण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवत आहेत. यामुळे या योजनांपासून वंचित रहावे लागेल या गैरसमजुतीतून नागरिकांकडून सर्वेक्षण करताना पुरेशी माहिती दिली जात नाही. यामुळे केवळ सामाजिक व शैक्षणिक माहिती घेऊन सर्वेक्षण करण्याची सूचना जिल्हा प्रभारी सचिव विपुल बन्सल यांनी दिली. खानापूर तालुक्यातील काही डोंगराळभागात तांत्रिक अडचणी येत आहेत. मात्र सर्वेक्षण कर्मचारी प्रत्येक घरात जाऊन सर्व्हे करत आहेत. सर्वेक्षण करताना शिबिरे आयोजित करून यामध्ये नागरिकांना सहभागी करून घ्यावे. तसेच आयोगाकडून सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आयोगाला केले.
नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यात प्रत्येक घरात जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. मात्र नागरिक आर्थिक माहिती देण्यास कचरत असल्याचे जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी सांगितले. महापालिका व्याप्तीतील हजारो नागरिकांकडून दोन दिवसांत माहिती घेण्यात आली आहे. शहरी भागात स्वत:हून आपली सर्व माहिती देण्याच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मनपा आयुक्त शुभा बी. यांनी सांगितले.
जिल्ह्यातील 36 कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांत 100 टक्के सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. यामुळे सदर कर्मचाऱ्यांचा आयोगाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अभिनव जैन, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, नगरविकास प्रकल्प संचालक मल्लिकार्जुन कलादगी, जि. पं. योजना संचालक रवी बंगारप्पनवर, कृषी खात्याचे सहसंचालक एच. डी. कोळेकर, डीडीपीआय लीलावती हिरेमठ, डीएचओ डॉ. ईश्वर गडाद, महिला बालकल्याण खात्याचे उपसंचालक चेतनकुमार यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात एकूण 11 लाख 85 हजार 888 कुटुंबे...
जिल्ह्यात एकूण 11 लाख 85 हजार 888 कुटुंबे आहेत. तांत्रिक समस्यांमुळे सर्वेक्षणापासून वंचित राहिलेल्या 16 हजार 711 कुटुंबीयांचे विशेष शिबिराच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 10 हजार 200 कर्मचारी सर्वेक्षणाचे काम करत असून आतापर्यंत जिल्ह्यात 30.55 टक्के सर्वेक्षण काम झाले आहे. अतिरिक्त 500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यास आणखी वेगाने काम होणार असल्याचे जिल्हा मागासवर्गीय कल्याण विभागाचे अधिकारी हर्षा यांनी सांगितले.