For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नोसकोव्हा, अल्कारेझ, अॅड्रिव्हा, बोपण्णा-एब्डन पुढील फेरीत

06:58 AM Jan 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
नोसकोव्हा  अल्कारेझ  अॅड्रिव्हा  बोपण्णा एब्डन पुढील फेरीत
Advertisement

ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस : टॉप सिडेड स्वायटेक, ब्राझीलची हेदाद माया पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

येथे सुरू असलेल्या 2024 च्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत शनिवारी महिला एकेरीमध्ये पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेकचे आव्हान तिसऱ्या फेरीतच झेकच्या लिंडा नोसकोव्हाने संपुष्टात आणले. गॉफ, सबालेंका यांनी चौथ्या फेरीत स्थान मिळविले. ब्राझीलच्या हेदाद मायाचे आव्हानही संपुष्टात आले. पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार एब्डन यांनी दुहेरीची तिसरी फेरी गाठली. पुरुष एकेरीत स्पेनच्या अल्कारेझने तसेच ग्रीकचा सित्सिपस  शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळवले.

Advertisement

महिला एकेरीच्या शनिवारी झालेल्या तिसऱ्या फेरीत झेकच्या 19 वर्षीय लिंडा नोसकोव्हाने पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकचा 3-6, 6-3, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत या स्पर्धेत पदार्पणातच चौथी फेरी गाठली आहे. स्वायटेकने आतापर्यंत चारवेळा ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवली आहेत पण तिला अद्याप ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा मात्र जिंकता आली नाही. स्वायटेकची गेल्या 18 सामन्यातील विजयी घोडदौड मात्र झेकच्या नोसकोव्हाने रोखली. महिला एकेरीच्या अन्य एका सामन्यात रशियाच्या मारिया टिमोफेवाने ब्राझीलच्या ब्रिट्रेज हेदाद मायाचा 7-6(9-7), 6-3, अमेरिकेच्या कोको गॉफने आपल्याच्या देशाच्या अॅलिसिया पार्कसचा 6-0, 6-2 असा पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळवले. बेलारुसच्या सबालेंकाने युक्रेनच्या लिसा सुरेंकोचे आव्हान 6-0, 6-0 असे एकतर्फी संपुष्टात आणत चौथी फेरी गाठली.  महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात रशियाच्या 16 वर्षीय मिरा अॅड्रिवाने फ्रान्सच्या डायनी पॅरीचा 1-6, 6-1, 7-6(10-5) असा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश केला.

पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात स्पेनच्या द्वितीय मानांकित कार्लोस अल्कारेझने चीनच्या शेंग जूनचेंगचा 6-1, 6-1, 1-0 असा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळवला. या सामन्यात चीनच्या जूनचेंगने दुखापतीमुळे तिसरा सेट अर्धवट सोडल्याने अल्कारेझने ही लढत केवळ 66 मिनिटात जिंकली. अल्कारेझचा पुढील फेरीतील सामना सर्बियाच्या किमेनोव्हिकशी होणार आहे. किमेनोव्हिकने तिसऱ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या चौदाव्या मानांकित टॉमी पॉलचा पाच सेट्समधील लढतीत पराभव केला. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील झालेल्या अन्य सामन्यामध्ये अमेरिकेच्या टेलर फ्रिझने हंगेरीच्या मेरोजसेनचा 3-6, 6-4, 6-2, 6-2 असा पराभव केला. ग्रीकच्या सित्सिपसने चौथी फेरी गाठताना फ्रान्सच्या लुका व्हॅन अॅशेचा 6-3, 6-0, 6-4 असा फडशा पाडला. रशियाच्या कॅचेनोव्हने झेकच्या टॉमस मॅकेचा 6-4, 7-6(7-4), 4-6, 7-6(7-5), तसेच ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरने इटलीच्या कोबोलीचा 6-3, 6-3, 6-1 असा पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळवले.

पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एब्डन यांनी तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले. द्वितीय मानांकित जोडी बापण्णा आणि एब्डन यांनी ऑस्ट्रेलियाच्या वाईल्ड कार्डधारक जोडी मिलमन आणि विंटर यांचा 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली. तिसऱ्या फेरीत बोपण्णा आणि एब्डन यांची गाठ हॉलंडचा कुलहॉप आणि क्रोएशियाचा मेकटीक यांच्याशी होणार आहे. या स्पर्धेत गुरुवारी पहिल्या फेरीमध्ये बोपण्णा आणि एब्डन यांनी ऑस्ट्रेलियाच्या डकवर्थ आणि पोलमन्स यांचा 7-6 (6-8,), 6-4, 7-6 (10-8) असा पराभव करत विजयी सलामी दिली होती. या स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीत भारताचा श्रीराम बालाजी आणि त्याचा रुमानियाचा साथीदार व्हिक्टर कोरेना यांनी इटलीच्या अमाल्दी आणि पेलीग्रीनो यांचा 6-3, 6-4 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. पण दुसऱ्या फेरीत बालाजी आणि कोरेना यांचे आव्हान एलसाल्वादोरचा अर्वेलो आणि क्रोएशियाचा पेविक यांच्याकडून समाप्त झाले. अर्वेलो आणि पेविक यांनी हा सामना 6-3, 6-4 असा जिंकत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत मिश्र दुहेरीमध्ये रोहन बोपण्णा आणि त्याची साथीदार बेबोस यांनी माघार घेतली आहे.

Advertisement
Tags :

.