रक्तदाबाचे कारण नाकातील रंध्रे ?
रक्तदाब किंवा ब्लडप्रेशर या विकाराचा भारतात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. लवकरच भारत रक्तदाब आणि त्याच्या जोडीला मधुमेह किंवा डायबेटीस यांची जागतिक राजधानी होईल, अशी शक्यता व्यक्त केली जाते. या दोन्ही विकारांवर जगात जोरदार संशोधन होत आहे. कित्येकदा संशोधन क्षेत्रात असे घडते की, संशोधन वेगळ्याच विषयावर होत असते पण त्या संशोधनाचे फलित एका वेगळ्यास समस्येवर उपयोगी पडते. असाच काहीसा प्रकार घडला आहे.
आपण नाकाने श्वास घेतो तसा वासही घेतो. कारण नाकात घ्राणरंध्रे असतात. त्यांच्यामुळे आपल्याचा गंध किंवा वास यांची जाणीव होते. या रंध्रांवर सध्या मोठे संशोधन होत आहे. हे संशोधन होत असताना असे दिसून आले की गंधाची जाणीव करुन देणारी ही रंध्रे रक्तदाबाचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी कारणीभूत असतात. या निरीक्षणातून संशोधकांना गंधरंध्रांच्या माध्यमातून उच्च रक्तदाबावर उपचार सापडू शकतील असे वाटत आहे. तसे झाल्यास रक्तदाबावर एक अत्यंत प्रभावी आणि सुलभ उपचारपद्धती विकसीत होऊ शकेल, असाही त्यांचा विश्वास आहे. अर्थातच यावर अधिक संशोधकाची आवश्यकता असून ते केले जात आहे.