मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ चित्रपटावर नॉर्वेचा आक्षेप
भारतीय आम्हाला निर्दयी समजतील ः राजदूत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राणी मुखर्जीचा नवा चित्रपट ‘मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे’चे समीक्षकांकडून कौतुक होत आहेत. चित्रपटात एक भारतीय महिला स्वतःच्या मुलांना परत मिळविण्यासाठी नॉर्वेच्या पूर्ण कायदेशीर व्यवस्था आणि प्रशासनाशी लढत असल्याचे दाखविण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सागरिका भट्टाचार्यने केले आहे. याचदरम्यान भारतातील नॉर्वेचे राजदूत हंस जॅकोब प्रैडुलंड यांनी चित्रपटावर आक्षेप घेतला आहे.
हा चित्रपट आमच्या देशाविषयी एक पूर्णपणे चुकीचा दृष्टीकोन मांडतो आणि यात ‘तथ्यात्मक त्रुटी’ आहेत. तसेच चित्रपटाची कहाणी वस्तुस्थिती दर्शविणारी नाही. चित्रपटात प्राथमिक घटक म्हणून सांस्कृतिक वेगळेपण दाखविण्यात आले असून ते पूर्णपणे चुकीचे आहे. लहान मुलांना हाताने अन्न भरविणे आणि एकाच बेडावर झोपविणे हे मुलांना ऑल्टरनेटिव्ह केयरमध्ये ठेवण्याचे कारण नव्हते असे हंस यांनी म्हटले आहे.
चित्रपटात जे दर्शविण्यात आले आहे, त्याच्या उलट नॉर्वेमधील लोक देखील स्वतःच्या मुलांना स्वतःच्या हातांनी अन्न भरवत असतात आणि त्यांना झोपतेवेळी गोष्टी सांगतात. चुकीची माहिती मांडली जात असल्याने मला ही भूमिका मांडावी लागली आहे. या चित्रपटामुळे आमचे भारतीय मित्र नॉर्वेच्या लोकांना निर्दयी, अत्याचारी समजू शकतात अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.