हालांदाच्या गोलामुळे नॉर्वेची आयव्हरी कोस्टवर 2-1 ने मात
विश्वचषकाच्या बाद फेरीतील पहिलाच विजय, ब्राझीलशी होणार पुढील लढत
वृत्तसंस्था, आर्लिंग्टन, टेक्सास : नॉर्वेने विश्वचषकात पहिल्यांदाच बाद फेरीतील सामना जिंकल्यानंतर अर्लिंग हालांदने त्या क्षणाचा आनंद लुटला. मंगळवारी झालेल्या सामन्यात 86 व्या मिनिटाला हालांदने डाव्या पायाने मारलेल्या एका हलक्या फटक्यामुळे निर्णायक फरक पडला आणि नॉर्वेने आयव्हरी कोस्टचा 2-1 असा पराभव केला. या विजयामुळे आता त्यांची गाठ पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलशी पडणार आहे. ज्याला नॉर्वेजियन लोक आतापर्यंतचा सर्वांत महान विजय मानतात त्याच्यानंतर 28 वर्षांनी हा सामना होणार आहे.
पहिल्या सत्रात आंतोनियो नुसाने ‘कर्लिंग किक’द्वारे नॉर्वेसाठी पहिला गोल केला. आपल्या चौथ्या विश्वचषकात खेळणारा नॉर्वेचा संघ आता उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये रविवारी ईस्ट रदरफोर्ड, न्यू जर्सी येथील मेटलाइफ स्टेडियमवर ब्राझीलचा सामना करणार आहे. 1998 नंतर नॉर्वेचा हा पहिलाच विश्वचषक सहभाग आहे. त्यावेळच्या स्पर्धेत साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात तत्कालीन विश्वविजेत्या ब्राझीलविरुद्ध 83 व्या आणि 89 व्या मिनिटाला गोल करून नॉर्वेने 2-1 असा अविश्वसनीय विजय मिळवला होता आणि बाद फेरीत प्रवेश केला होता.
दुसऱ्या सत्राच्या सुऊवातीला नॉर्वेला दोन गोलांची आघाडी घेण्यापासून रोखणाऱ्या अमाद डियालोने 74 व्या मिनिटाला डाव्या पायाने चेंडू फटकावून गोल करत आयव्हरी कोस्टसाठी सामना बरोबरीत आणला. हालांदने आघाडी मिळवून देणारा केलेला गोल हा त्याच्या 53 सामन्यांमधील 60 वा गोल होता आणि नॉर्वेसाठी तो एक विक्रम आहे. हा गोल होऊनही आयव्हरी कोस्टने दबाव कायम ठेवला. ‘स्टॉपेज टाइम’च्या सहाव्या मिनिटाला डियालोला थेट फ्री-किकद्वारे सामना बरोबरीत आणण्याची संधी मिळाली होती. परंतु ओरजान नायलँडने हवेत झेप घेत चेंडू अडवला., हा त्याचा चौथा बचाव ठरला.
संपूर्ण सामना खेळलेल्या नॉर्वेच्या खेळाडूंमध्ये हालांदने चेंडूला सर्वांत कमी वेळा (27 वेळा) स्पर्श केला होता. मात्र पॅट्रिक बर्ग चेंडूसह पेनल्टी एरियामध्ये शिरला आणि त्याने जलद पास दिला तेव्हा तीन बचावपटू त्याच्याकडे वळल्यामुळे हालांद मोकळा राहिला. हालांदच्या पायाला लागून चेंडू हळूच गोल-लाइन ओलांडून आत गेला. या स्पर्धेतील तीन सामन्यांमधील हालांदचा हा पाचवा गोल आहे. हा आकडा लायेनेल मेस्सीपेक्षा एकाने कमी आहे.
नुसाने 39 व्या मिनिटाला आपला पहिला विश्वचषक गोल केला. त्याने पेनल्टी क्षेत्राच्या डाव्या कोपऱ्यातून काही पावले पुढे जात दोन बचावपटूंच्या मधून उजव्या पायाने चेंडू फटकावला. आयव्हरी कोस्टचा गोलरक्षक याहिया फोफानाने चेंडू अडवण्यासाठी झेप घेतली, परंतु चेंडू त्याच्या हाताच्या आवाक्याबाहेर होता. हवेत झेपावलेला असतानाच त्याने मागे वळून पाहिले तेव्हा चेंडू वळण घेत जाळीत शिरला होता. निकोलस पेपेसोबत चेंडूची देवाणघेवाण केल्यानंतर डियालोने गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला. पेपेने मागील सामन्यात आयव्हरी कोस्टचे दोन्ही गोल केले होते, मात्र या सामन्यात 55 व्या मिनिटाला नायलँडने त्याला रोखले.