नॉर्वेचा इराकवर 4-1 ने विजय, हालांदचे दोन गोल
वृत्तसंस्था
फॉक्सबोरो, मॅसॅच्युसेट्स : विश्वचषकात नॉर्वेची आगेकूच किती होईल हे अर्लिंग हालांदच्या कामगिरीवर अवलंबून असेल हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात आपण या आव्हानासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे त्याने दाखवून दिले. ‘गट आय’मधील सामन्यात हालांदने दोन गोल केले, ज्यापैकी एक गोल प्रतिस्पर्ध्याच्या बचावातील चुकीमुळे झाला. यामुळे नॉर्वेला इराकविऊद्ध 4-1 असा विजय नोंदवता आला.
मँचेस्टर सिटीच्या या आघाडीपटून केलेले हे त्याचे 56 वे आणि 57 वे आंतरराष्ट्रीय गोल होते. हालांद म्हणाला की, त्याच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करेल. मार्टिन ओडेगार्डने हाणलेल्या कॉर्नर किकवर लिओ ओस्टिगार्डने 76 व्या मिनिटाला गोल केला. सामना संपण्याच्या अगदी काही क्षण आधी इराकचा आघाडीपटू आयमेन हुसेन याच्याकडून झालेल्या स्वयंगोलमुळे नॉर्वेच्या गोलांची संख्या 4 वर गेली.
हुसेनने आपल्या संघासाठी गोलही केला होता. हालांदच्या पहिल्या गोलनंतर अवघ्या नऊ मिनिटांत त्याने गोल करून सामना बरोबरीत आणला होता. मध्यंतराच्या अगदी आधी हालांदने नॉर्वेला आघाडी मिळवून दिली, जी कायम राहिली. इराकचा गोलरक्षक जलाल हसन याच्याकडे पाठवलेला ‘बॅक-पास’ कमकुवत होता. हालांदने चपळाईने त्या चेंडूपर्यंत झेप घेतली आणि हसनकडून चेंडू दूर सारला जाण्याआधी तो तिथे पोहोचला. त्यानंतर त्याने आपल्या पायाच्या पुढच्या भागाचा वापर करून चेंडू जाळीत रवाना केला.