उत्तर कोरियाने डागले 200 तोफगोळे
दक्षिण कोरियाने दोन बेटं रिकामी करण्याचा दिला आदेश : चिथावणी देणारे कृत्य असल्याची टिप्पणी
वृत्तसंस्था/ सोल
उत्तर कोरियाने शुक्रवारी दक्षिण कोरियाच्या दिशेने 200 तोफगोळे डागले आहेत. उत्तर कोरियाच्या या हल्ल्यामुळे कुठल्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या योनप्योंग बेटाच्या दिशेने हे तोफगोळे डागले आहेत. यानंतर कोरियाच्या प्रशासनाने लोकांना बेट रिकामी करण्याची सूचना करण्यात आली आहे. याचबरोबर बेंगनीओंग बेटावरील लोकांनाही स्थलांतर करण्याच आदेश देण्यात आला आहे.
उत्तर कोरियाचा हुकुमशहा किंम जोंग उन यांच्या या कृत्याला दक्षिण कोरियाने चिथावणीपूर्ण ठरविले आहे. उत्तर कोरियाने अशाचप्रकारची आगळीक 2010 मध्ये देखील केली होती. त्यादरम्यान योनप्योंग बेटावरील 4 जणांचा मृत्यू झाला होता. तर 13 वर्षांनी उत्तर कोरियाकडून डागण्यात आलेले तोफगोळे हे बफर झोनमध्ये कोसळले आहेत. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांचा कब्जा नसलेल्या भागात हे तोफगोळे पडल्याने जीवितहानी टळली आहे.
युद्ध पेटण्याची शक्यता
उत्तर कोरियाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यांनतर ही घटना घडली आहे. उत्तर कोरिया युद्धाची तयारी (कुठल्याही क्षणी युद्ध सुरू होण्याची शक्यता) करत आहे. याकरता तो शस्त्रास्त्रांची जमवाजमव करत असून सैन्यशक्ती वाढवत आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेकडून सैन्य कारवाई करण्यात आल्यास आम्ही मागे हटणार नाही. पूर्ण शक्तिनिशी हल्ला करत विरोधकांचा खात्मा करणार आहोत असे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी 1 जानेवारी रोजी म्हटले होते. अलिकडेच उत्तर कोरियाने दक्षिण कोरियासोबत झालेला एक सैन्य करार संपुष्टात आणला आहे. या कराराचा उद्देश दोन्ही देशांमधील संबंध सुधारणे होता.
किम यांच्या हत्येचा कट
दक्षिण कोरियाचे सैन्य उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांची हत्या घडवून आणण्याची तयारी करत आहे. किम यांच्या संभाव्य हत्येसाठी आमचे सैन्य ‘हत्या सराव’ (डिकॅपिटेशन ड्रिल) करत असल्याचे दक्षिण कोरियाने मान्य केले आहे. उत्तर कोरियाचा सामना करण्यासाठी हुकुमशहाची हत्या एक पर्याय आहे. यासाठी आमचे सैन्य सराव करत आहे. अमेरिकेचे सैन्य याप्रकरणी आम्हाला साथ देत असल्याचे दक्षिण कोरियाच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे.
अमेरिकेचा पाठिंबा
उत्तर कोरियाने मार्च 2023 मध्ये पहिल्यांदा स्वत:ची अण्वस्त्रs जगासमोर आणली होती. उत्तर कोरियाने स्वत:च्या अण्वस्त्रांना ‘हवासॅन-31’ नाव दिले आहे. उत्तर कोरियाची अण्वस्त्रs छोट्या आकाराची असली तरीही ती आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना जोडून अमेरिका आणि दक्षिण कोरियात विध्वंस घडवून आणण्याची क्षमता आहे. याचमुळे अमेरिकेने दक्षिण कोरियाला सैन्यमदत पुरविण्याचे धोरण स्वीकारले आहे.