अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराने उत्तर कर्नाटक हादरले
हुबळीत दोन मुलींवर सामूहिक अत्याचार : दोन घटनांप्रकरणी सात अल्पवयीन मुले ताब्यात
प्रतिनिधी/ बेंगळूर
हुबळीत एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराने संपूर्ण उत्तर कर्नाटकला हादरवून टाकले आहे. शहर आणि अशोकनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या या दोन अत्याचाराच्या घटनांमध्ये अल्पवयीन आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत 14-15 वयोगटातील तीन मुलांनी 13 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार केला आहे. मुलीचे पालक घरी नसताना त्याच परिसरात राहणाऱ्या मुलांनी तिला एका निर्जन भागात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पीडित मुलीला संरक्षण देण्यात आले असून तिन्ही मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे हुबळी-धारवाड पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी सांगितले.
आरोपींपैकी दोन माध्यमिक शाळेचे विद्यार्थी आहेत तर आणखी एक मुलगा शाळा सोडली आहे. मुलांनी मुलीला या कृत्याचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचे धमकावले आहे, असे पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. आरोपींचे मोबाईल फोन देखील जप्त करून त्यांची आवश्यक चौकशी केली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
याचबरोबर अशोकनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, संशयित आरोपींनी पीडितेच्या वडिलांनाही मारहाण केली आहे, अशी माहितीही पोलीस आयुक्त शशीकुमार यांनी दिली. पहिल्या प्रकरणाशी संबंधित तीन आणि दुसऱ्या प्रकरणाशी संबंधित चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.