उत्तर भारत दाट धुक्याच्या गर्तेत
रेल्वे-रस्त्यांपासून हवाई वाहतूक प्रभावित : तीन दिवसात 800 हून अधिक उड्डाणांना फटका, रेल्वेगाड्यांनाही विलंब
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील बहुतांश भागातील जनजीवन धुक्यामुळे विस्कळीत झाले आहे. खराब हवामानामुळे शेकडो रेल्वे आणि उड्डाणे उशिराने धावत आहेत. काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. रविवारी दिल्ली विमानतळावर 100 हून अधिक उड्डाणांना विलंब झाला होता. तसेच रस्ते वाहतूकही प्रभावित झाली असून अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत.
जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या हिमवृष्टीमुळे संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा प्रभाव वाढत आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपासून पर्वतमय भागात बर्फवृष्टी सुरू झाली असून आणखी काही दिवस सुरू राहू शकते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव अद्याप पूर्णपणे ओसरलेला दिसत नाही. आता हवामान खात्याने जारी केलेल्या नव्या अंदाजानुसार महिन्याच्या तिसऱ्या-चौथ्या आठवड्यापर्यंतही थंडी कमी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, 7 ते 10 जानेवारी दरम्यान उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. तसेच किमान तापमानात घट झाल्यामुळे थंडी आणखी वाढणार आहे.
तीन दिवसांत अनेक उड्डाणे प्रभावित
दिल्ली विमानतळावर दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने गेल्या तीन दिवसांपासून विमानसेवा प्रभावित झाली आहे. शुक्रवारी 200 हून अधिक उ•ाणांना विलंब झाला. तर शनिवारी 45 उड्डाणे रद्द तर 19 उड्डाणे वळवण्यात आली. याचदरम्यान कमी दृश्यमानतेमुळे 165 फेऱ्यांच्या वेळा बदलण्यात आल्या. खराब हवामानामुळे दिल्ली, अमृतसर, चंदीगड, कोलकाता आणि लखनौला जाणाऱ्या आणि जाणाऱ्या फ्लाईटला विलंब होत आहे. येथे दररोज सुमारे 1300 उड्डाणे ये-जा करत असतात. विमानोड्डाणांचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे अद्ययावत माहितीसाठी प्रवाशांना संबंधित एअरलाईन्सशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली आहे.
श्रीनगरहून 10 उड्डाणे रद्द
धुक्यामुळे श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी दहा उ•ाणे रद्द करण्यात आली. येथे सकाळी दृश्यमानता केवळ 50 मीटर असल्यामुळे उड्डाणांवर परिणाम झाला. शनिवारीही दाट धुक्यामुळे विमानतळावरील कामकाजावर परिणाम झाला. त्यामुळे विमानांना उशीर झाला आणि अनेक उड्डाणे वळवण्यात आली.
युपी-बिहारमध्ये थंडीमुळे 10 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात उत्तर प्रदेशात 8 आणि बिहारमध्ये 2 जणांना थंडीमुळे जीव गमवावा लागला आहे. अरुणाचल प्रदेशातील सेला तलावाचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये 4 पर्यटक अडकलेले दिसत आहेत. गोठलेल्या तलावावर चालताना हे सर्वजण अडकले. मात्र, नंतर त्यांची सुटका करण्यात आली. मध्यप्रदेशातील मांडला येथील तापमान 4 अंशांवर पोहोचले आहे. काश्मीर आणि चिनाब खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचवेळी हिमाचल प्रदेशातील 7 जिल्ह्यांमध्ये जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.