नोरोव्हायरस संसर्गामुळे चीनमध्ये घबराट
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनमध्ये पुन्हा एकदा विषाणूच्या संसर्गामुळे चिंता वाढली आहे. कोविड-19 नंतर आता नोरोव्हायरसमुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दक्षिण चीनमधील ग्वांगडोंग प्रांतातील फोशान शहरातील एका हायस्कूलमधील 100 हून अधिक विद्यार्थ्यांना विषाणूची लागण झाली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, एकूण 103 विद्यार्थ्यांना पॉझिटिव्ह चाचणी मिळाली आहे. तथापि, सर्व संक्रमित विद्यार्थ्यांची प्रकृती ठिकठाक असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
संसर्ग झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर गुंतागुंत झालेली नाही आणि कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. खबरदारी म्हणून शाळेच्या कॅम्पसमध्ये पूर्णपणे स्वच्छता करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर नियमितपणे लक्ष ठेवले जात आहे. संक्रमित विद्यार्थ्यांना उलट्या आणि अतिसारासह पोटाच्या समस्या जाणवत आहेत. नोरोव्हायरसची सामान्य लक्षणे असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक उपचार दिले जात आहेत. विषाणूचा स्रोत निश्चित करण्यासाठी चौकशी सुरू आहे. ग्वांगडोंग प्रांत रोग नियंत्रण विभागाच्या मते, दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च दरम्यान या प्रदेशात नोरोव्हायरसचे रुग्ण सामान्यत: सर्वाधिक असतात. थंडीच्या काळात हा विषाणू वेगाने पसरतो. विशेषत: शाळा, वसतिगृहे आणि गर्दीच्या ठिकाणी याचा धोका जास्त असतो.