व्हेनेझुएलातील सामान्य जनजीवन कोलमडले
अमेरिकेच्या हल्ल्यात अनेक निवासी इमारतींचेही नुकसान
वृत्तसंस्था/ कराकस
अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यांनंतर आणि राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर व्हेनेझुएलाची राजधानी कराकस आणि आसपासच्या भागात परिस्थिती भयानक आहे. बॉम्बस्फोटांमुळे सामान्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. बऱ्याच भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच दळणवळण व्यवस्थाही कोलमडली आहे. नजिकच्या काळात अन्न संकट निर्माण होण्याची शक्यताही गृहीत धरली जात आहे.
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनी राजधानीला हादरवून टाकले आहे. सर्वात मोठे नुकसान फ्युएर्टे ट्युना येथे झाले असून येथील केंद्रातून कराकस आणि आसपासच्या भागात वीजपुरवठा केला जातो. अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे व्हेनेझुएलाच्या ला ग्वेरा शहरातील एका निवासी इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्फोटानंतर इमारतीभोवती पूर्णपणे कचरा विखुरलेला दिसून आला. ला ग्वेरा हे व्हेनेझुएलातील एक प्रमुख बंदर शहर असून ते राजधानी कराकसच्या अगदी जवळ आहे. अमेरिकेच्या कारवाईदरम्यान या शहरालाही लक्ष्य करण्यात आले होते.
फ्युएर्टे ट्युना हा व्हेनेझुएलाचा सर्वात मोठा लष्करी तळ मानला जातो. येथून अनेक महत्त्वाचे प्रशासकीय आणि लष्करी निर्णय घेतले जातात. हल्ल्यांनंतर, कराकस विमानतळ आणि राजधानीपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका प्रमुख हवाई तळालाही लक्ष्य करण्यात आले. परिणामी, देशातील वाहतूक जवळजवळ पूर्णपणे ठप्प झाली.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे परिस्थिती बिकट
सार्वजनिक वाहतूक बंद असून टॅक्सी आणि बसेस रस्त्यावरून धावताना दिसत नाहीत. बाहेर पडणाऱ्यांना पायी लांब अंतर पार करावे लागत आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून संध्याकाळ होताच लोक आपापल्या घरातच बंदिस्त राहत आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कराकसचा मोठा भाग अंधारात बुडाला आहे. मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवांवर गंभीर परिणाम झाल्यामुळे लोकांना त्यांच्या प्रियजनांशी संपर्क साधणेही कठीण झाले आहे.
अन्नपदार्थ, पाण्याचीही वानवा
हल्ल्यानंतर जवळजवळ सर्व प्रमुख सुपरमार्केट बंद असल्यामुळे अन्नपदार्थ व जीवनावश्यक वस्तू मिळण्याची समस्याही तीव्र झाली आहे. पाणी मिळविण्यासाठीही लोकांना मोठी कसरत करावी लागत आहे. भीतीमुळे लोक शक्य तितके किराणा सामान साठवण्याचा प्रयत्न करत असले तरी आता किराणा माल मिळविण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे.