मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प
पणजी : गोव्यात पावसाने आपला धुमाकूळ चालूच ठेवला असून आगामी 48 तासात त्याचा वेग आणखीन थोडा वाढण्याची शक्मयता आहे. बंगालच्या खाडीत निर्माण झालेले चक्रीवादळ हे तामिळनाडूसह कर्नाटक व साहजिकच गोव्यावरही परिणामकारक ठरणार आहे. गोव्यात मुसळधार पावसाने रविवारी देखील जनजीवन ठप्प करून टाकले. अजून चार दिवस पाऊस जोरदार कोसळत राहणार आहे. रविवारी पावसाने आणखीन एक नवा रेकॉर्ड करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वत्र जोरदार वृष्टी केली. सध्याची परिस्थिती पाहता गोव्यात अजून आठ दिवस तरी पाऊस कोसळेल, अशी चिन्हे दिसत आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गोव्यात पाऊस पडणार तसेच एकंदरीत चित्र आहे.
अरबी समुद्रात गोव्यापासून 790 किलोमीटर दूर चक्रीवादळ तयार होत आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे बंगालच्या खाडीतही चक्रीवादळ तयार झालेले असून ते आगामी 24 तासात तामिळनाडूत प्रवेश करेल, असा अंदाज आहे. या चक्रीवादळाचा वेग आणि दिशा पाहता हे वादळ केवळ तामिळनाडूलाच त्रासदायक ठरणार नाही, तर त्याचा गंभीर परिणाम कर्नाटक राज्यावर देखील होणार आहे. कर्नाटकापासून ते कमी वेगाचे वादळ तथा जोरदार पाऊस गोव्यातही येण्याची शक्मयता आहे. अरबी समुद्रातील वादळाने अद्याप आपली दिशा ठरवलेली नाही, मात्र हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ते पूर्वेच्या दिशेने येत आहे. म्हणजेच भारतीय किनारपट्टीला या वादळापासून धोका उद्भवू शकतो. सध्या पडणारा पाऊस हा कमी दबाच्या पट्ट्याचा परिणाम आहे.
या परिस्थितीमध्ये हवामान खात्याने 29 ऑक्टोबरपर्यंत गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करून तेवढ्या दिवसांकरिता येलो अलर्ट जारी केला आहे. गोव्यावर दोन्ही बाजूच्या चक्रीवादळाचा परिणाम होणार असून अशाच पद्धतीने संततधार चालू राहणार आहे. रविवारी संपूर्ण गोव्याला पावसाने झोडपून काढले. पणजीत सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठपर्यंत पावणेतीन इंच पाऊस पडला. दिवसभर संपूर्ण गोव्यात ढगाळ हवामान राहिले आणि पावसाची संततधार चालूच राहिली. गेल्या 24 तासांमध्ये धारबांदोडा येथे सर्वाधिक अडीच इंच पावसाची नोंद झाली. मुरगाव, जुने गोवे येथे प्रत्येकी दीड इंच पावसाची नोंद झाली. पणजीत एक इंच, दाबेळी व साखळी येथे प्रत्येकी एक सेंटीमीटर, सांगे व फोंडा येथे एक सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडला. मान्सूनोत्तर पाऊस सव्वा आठ इंच झालेला आहे.