उत्तम संधीच्या शोधात नोरा
हिंदी शिकण्याचा प्रयत्न सुरूच
ज्ञान कुठूनही मिळाले तरीही स्वीकारावे असे बोलले जाते. असेच काहीसे अभिनेत्री नोरा फतेहीने केले आहे. हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नोराला हिंदी शिकण्याचे ज्ञान एका कारचालकाकडून प्राप्त झाले आहे. मी आता कारकीर्दीच्या या टप्प्यात बॉलिवूडमध्ये उत्तम संधीच्या शोधात असल्याचे नोराचे म्हणणे आहे.
जेव्हा कामाच्या शोधात मी कॅनडामधून मुंबईत दाखल झाले तेव्हा माझा खरा संघर्ष सुरू झाला. मी ऑडिशन देण्यासाठी जात होते. एकदा एका कारचालकाने मला नेमकं काय करायचं आहे अशी विचारणा केली. तेव्हा मी अभिनय करायचा असून स्टार व्हायचं असल्याचे सांगितले होते. मग या कारचालकाने प्रथम हिंदी शिक असा सल्ला दिला होता असे नोराचे सांगणे आहे.
त्यापूर्वी हिंदी शिकण्याचा विचारही मी केला नव्हता. माझ्या योजनेत हा मुद्दाच सामील नव्हता. कॅनडातून निघाल्यावर हिंदी शिकावी लागेल हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते. मग मी हिंदीचा शिक्षक शोधला, त्याच्याकडून दररोज 6-8 तास हिंदीचे धडे गिरवत होते असे नोरा सांगते.
हिंदी भाषेतील शब्द शिकण्यासाठी संबंधित शिक्षक मला होमवर्क द्यायचा, मी घरी बसून होमवर्क करत होते. चित्रपट आणि शो पाहण्याची सूचना शिक्षकाने केली होती, या चित्रपटातील संवादाचा अर्थ प्रथम मला समजत नव्हता. यामुळे मी ते संवाद लिहून ठेवायचे आणि त्याचा अर्थ विचारत होते असे नोराने सांगितले आहे.