नूडल्स सज्ज केवळ 48 सेकांदांमध्ये
‘बस दो मिनट’ ही इन्स्टंट नूडल्सची जाहिरात आपल्या परिचयाची आहे. केवळ दोन मिनिटात गरमागरम नूडल्स आपल्यासमोर खाण्यासाठी येतील, असे ही जाहिरात म्हणते. चीनमध्ये शेनजेन शहरात एक रेस्टॉरंट असे आहे, की जिथे तुम्ही ऑर्डर दिल्यापासून केवळ 48 सेकंदांमध्ये आपल्यासमोर नूडल्सची डिश येते. याचाच अर्थ असा की आपल्या तोंडातून नूडल्स हा शब्द बाहेर पडताक्षणीच त्या तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला जातो आणि अक्षरश: पाऊण मिनिटापेक्षा किंचित जास्त वेळेत आपल्यासमोर हा पदार्थ ठेवला जातो. इतक्या वेगात नूडल्स बनविल्या जात असूनही त्यांची गुणवत्ता आणि चव अत्युत्तम असते, असे या रेस्टॉरंटचे वैशिष्ट्या आहे. या खाद्यपेयगृहाचे नाव ‘फ्युचर नूडल रेस्टॉरंट’ असे असून येथे जितक्या लवकर नूडल्स सज्ज केल्या जातात, तसे जगात कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये होत नाही, अशी ख्याती या खाद्यपेयगृहाने प्राप्त केल्याचे दिसते.
या नूडल्स शॉपचे क्षेत्रफळ केवळ 80 चौरस फूट आहे. म्हणजे ते आपल्याकडच्या एखाद्या छोट्या दुकान गाळ्याइतके आहे. येथे एक-दोन नव्हे, तर 10 वेगवेगळ्या प्रकारांच्या नूडल्स तोंडीलावण्यासह मिळतात. त्यांची किंमतही अन्य रेस्टॉरंटस्च्या मानाने बरीच कमी आहे. काऊंटरवर ऑर्डर बुक केली की पैसे देऊन होतात न होतात तोच दुसऱ्या काऊंटवर आपले पार्सल सज्ज असते. इतक्या झटपट ग्राहकाला हव्या त्या प्रकारच्या नूडल्स येथे कशा शिजविल्या जातात, हे एक कोडेच असल्याचे अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे. एखाद्या यंत्रमानवालाही जमणार नाही, इतक्या वेगाने हे काम चालते. विशेष म्हणजे या नूडल्स ताज्या असतात. नूडल्सना आकार देण्याचे काम आठ सेकंदांमध्ये, तर त्या उकळत्या पाण्यात शिजविण्याचे काम 30 ते 40 सेकंदांमध्ये केले जाते. अशा प्रकारे ग्राहकाला वेगवान सेवा मिळते. त्यामुळे या खाद्यपेयगृहाला अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली आहे.