थांबता थांबेना घरफोड्यांचे सत्र
रामतीर्थनगरात 10 लाखांची घरफोडी, परप्रांतीय गुन्हेगार सक्रिय
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. रामतीर्थनगर येथील एका बंद घराचा पाठीमागचा दरवाजा तोडून चोरट्यांनी सुमारे 10 लाखांचा ऐवज पळविला आहे. बुधवारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून गुरुवारी यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घरातील मंडळी नाताळच्या सुटीनिमित्त परगावी गेले असताना ही घटना घडली आहे. यासंबंधी रामतीर्थनगर येथील जोन्सकुमार कऱ्याप्पगोळ यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, पोलीस उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.
जोन्सकुमार व त्यांचे कुटुंबीय नाताळच्या सुटीसाठी परगावी गेले होते. हे सर्वजण बुधवार दि. 3 जानेवारी रोजी घरी परतले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी 14 तोळे सोन्याचे दागिने, 2 लाख रुपये रोख रक्कम पळविली आहे. पाठीमागचा दरवाजा फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे. उपलब्ध माहितीनुसार ही टोळी आंतरराज्य गुन्हेगारांची असल्याचे निष्पन्न झाले आहे. आनंदनगर-वडगाव, शहापूर, अनगोळ परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या गुन्हेगाराच्या कारवाया थंडावल्या असतानाच आता शहराच्या दुसऱ्या टोकावर घरफोड्यांचे सत्र सुरू झाले आहे. 28 डिसेंबरच्या रात्री परिसरात कुत्रे भुंकण्याचा आवाज येत होता. त्यामुळे त्याच दिवशी चोरीची ही घटना घडली असावी, अशी शक्यता आहे. याच परिसरातील आणखी दोन घरे फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.
खाजा सक्रिय
रामतीर्थनगर येथील घरफोडी प्रकरणी माळमारुती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन गुन्हेगारांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 28 व 29 डिसेंबरच्या मध्यरात्री रामतीर्थनगर परिसरात तिघा संशयितांची छबी फुटेजमध्ये कैद झाली असून हे गुन्हेगार परप्रांतीय असल्याची माहिती मिळाली आहे. याबरोबरच उपनगरात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या फुटेजमध्ये खाजा या अट्टल गुन्हेगाराची छबीही आढळून आली आहे. त्यामुळे चोऱ्या करण्यात खाजा सक्रिय झाल्याचा संशय बळावला असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत.