मराठा विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर दाखले तातडीने द्या; अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी
यापूर्वी निघालेले सर्व मराठा जात दाखले व नॉन क्रिमिलेअर दाखले रद्द झाले आहेत. यामुळे मराठा मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर दाखले तातडीने द्यावेत अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना मागणीचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर दाखले रद्द झाल्याने मराठा विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. हा शासन आदेश म्हणजे परीक्षा घोटाळयामुळे मेटाकुटीला आलेल्या विद्यार्थी तसेच पालकांसाठी कडेलोट आहे. या प्रक्रिया पुन्हा राबवायच्या म्हंटल्यास कमीत कमी दीड ते दोन महिने कालावधी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर एसईबीसी आरक्षणासाठी तातडीने अर्ज करावा लागणार आहे. नव्याने प्रवेश घेताना अडचणी येऊ नयेत यासाठी नवीन जीआरनुसार 28 जून 2024 नंतर दिल्या जाणाऱ्या सर्व दाखल्यासाठी लागू करावा, सदर दाखले जे व्हॅलिडीटीसाठी दाखल केले आहेत, त्यांची व्हॅलिडीटी त्याच दाखल्यावर द्यावी, हे शक्य नसेल तर कोणतीही नवीन मागणी न करता संबंधित कार्यालयांनी जीआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे जातीचा दाखला परिशिष्ठ अ व नॉन क्रिमिलेअर परिशिष्ठ बी हे वेगवेगळया प्रकारे वेबसाईटमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, ईबीसी सवलतधारक विद्यार्थ्यांचा जीआरमध्ये समावेश करावा, यापूर्वी काढलेले मराठा जातप्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर दाखले हे नवीन दाखले मिळेपर्यंत ग्राहय धरावेत. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, संजय पवार-वाईकर, प्रकाश पाटील, प्रकाश जाधव, किशोर डवंग, सतेज पाटील, दिपक पाटील, प्रणव डाफळे, अवधूत पाटील उपस्थित होते.