कडाडलेल्या विजेच्या मागणीत दिलासा अपारंपरिक ऊर्जेचा !
सध्या प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य आहे ते उकाडा असह्य होत चालल्याचं...त्यामुळं घरं, कार्यालयं नि आस्थापनांतील पंखे, वातानुकूलित यंत्रं, कूलर्स यांच्यावर अथक चालण्याची पाळी आलीय...या पार्श्वभूमीवर यंदा विजेच्या मागणीनं कधी नव्हे इतकी पातळी गाठलीय. त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ही गरज कसल्याच समस्येशिवाय पूर्ण करणं शक्य झालंय. त्यामागचं महत्त्वाचं कारण दडलंय ते अपारंपरिक ऊर्जेच्या वाढलेल्या हिश्श्यात...
भारतानं सौरऊर्जेच्या क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी बजावलीय...आणि देशानं अपारंपरिक ऊर्जेच्या जोरावर 25 एप्रिल रोजी विजेच्या बाबतीत कमालीच्या वाढलेल्ल्या मागणीला आत्मविश्वासानं सामोरं जात ती पूर्ण केली (लक्षणीय बाब म्हणजे अभियंत्यांनी कोणताही तुटवडा भासू दिला नाही अन् शेजारी देशांना होणारा विजेचा पुरवठाही अखंड चालू राहिला)...त्या दिवशी गरज होती ती 256.1 गिगावॅट्सची अन् तो ठरलाय विक्रम...सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत उकाड्याचे तीव्र चटके बसत असल्यानं फार मोठ्या प्रमाणात वाढलीय ती विजेची आवश्यकता...256.1 गिगावॅट्स हा आकडा झळकला तो दुपारी 3 वाजून 38 मिनिटांनी...
नवी दिल्लीनं केलेल्या पुरवठ्यात सर्वांत जास्त हिस्सा अपेक्षेनुसार कोळशाचा, तर सौरऊर्जेनं 60.5 गिगावॅट्सपर्यंत मजल मारली (एकूण मागणीच्या 22 टक्के)...‘ग्रिड कंट्रोलर ऑफ इंडिया’नं दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सौरऊर्जा प्रकल्प व ‘रूफटॉप सिस्टम्स’च्या क्षमतेत 81 गिगावॅट्सपर्यंत वृद्धी करण्यात यश मिळालं होतं. यापूर्वी 24 एप्रिल या दिवशी म्हणजेच शुक्रवारी भरतानं नोंदविला होता 252.1 गिगावॅट्सचा विक्रम. केंद्रीय वीज मंत्रालयाच्या अनुमानानुसार, यंदा शक्यता आहे ती मागणी तब्बल 271 गिगावॅट्सपर्यंत पोहोचण्याची...
कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पांनी प्रमुख भूमिका बजावलेली असली, तरी त्यांना योग्य साथ मिळाली ती सौरऊर्जेची, पाण्याच्या आधारे वीजनिर्मिती करणाऱ्या प्लांट्सची तसंच अणुशक्तीवर चालणारे प्रकल्प, वायू आणि पवनचक्क्यांची...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये या बाबीचा प्रामुख्यानं उल्लेख केला अन् भविष्यातील अपारंपरिक ऊर्जेला असलेलं महत्त्व स्पष्ट केलं...
‘भारताचं भविष्य मुठीत आहे ते हरित ऊर्जेच्या. पश्चिम आशियात सध्या चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही बाब जास्तच ठळकपणे दिसायला लागलीय. भारताच्या विकासाच्या दृष्टीनं फार महत्त्व आहे ते सौरऊर्जेला व पवनचक्क्यांना. त्यांच्यात क्षमता आहे ती देशाच्या भविष्याला सांभाळण्याची. मी विविध प्रकल्पांवर काम करणाऱ्या अभियंत्यांचा देखील आभारी आहे. वाळवंटी प्रदेशातील अपारंपरिक ऊर्जेच्या ‘एनर्जी पार्क्स’मध्ये युवकांना व कुशल कामगारांना रोजगार पुरविण्याची ताकद लपलीय’, मोदींचे शब्द...
25 एप्रिल रोजी विजेची मागणी अशी पूर्ण झाली...
माध्यम गिगावॅट्स
कोळशावरील प्रकल्प 171.8
सौरऊर्जा 60.5
पाण्यावरील वीजनिर्मिती प्रकल्प 11.2
अणुशक्तीवरील प्रकल्प 6.3
वायूवरील प्रकल्प 4.9
पवनचक्क्या 4.6
गेल्या तीन वर्षांत सर्वोच्च मागणीच्या वेळी हरित ऊर्जेची कामगिरी...
वर्ष हरित ऊर्जेचा हिस्सा
2023 10.9 टक्के
2024 15.1 टक्के
2025 15.4 टक्के
अशी नोंदली गेली विजेची मागणी...
? शनिवार, 25 एप्रिल रोजीच्या उच्चांकावरून रविवार, 26 एप्रिल रोजी विजेची कमाल मागणी कमी होऊन 238.15 गिगावॅट्सवर पोहेचली...कारण बहुतांश व्यावसायिक आणि औद्योगिक आस्थापनं बंद होती. शिवाय देशातील काही भागांत आलेल्या धुळीच्या वादळामुळं नि तुरळक पावसामुळं विजेचा वापर कमी प्रमाणात झाला....
? पण सोमवार 27 एपिल रोजी विजेची सर्वोच्च मागणी पुन्हा वरच्या दिशेनं झेपावून तिनं आकडा नोंदवला तो 255.85 गिगावॅट्सचा...अवघ्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा विजेच्या मागणीनं हा विक्रमी स्तर गाठला तो उत्तर, मध्य व पश्चिम भारतात सर्वत्र पसरलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटेमुळं. त्याला तोंड देण्यासाठी वातानुकूलित यंत्रं व डेझर्ट कूलर्ससारख्या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला...
? वीज मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यातील (1 ते 27) विजेच्या वापरात गेल्या वर्षीच्या त्याच कालावधीशी तुलना केल्यास 8 ते 9 टक्क्यांची लक्षणीय वाढ दिसून आलीय...
? तरीही या मागणीचं आव्हान पेलणं शक्य झालंय ते आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये सुमारे 65 गिगावॅट्सची विक्रमी भर पडल्यामुळं. परिणामस्वरुप उच्च मागणीच्या परिस्थितीला हाताळण्यासाठीची यंत्रणेची सज्जताही वाढलीय...या पार्श्वभूमीवर आम्ही यंदा सुमारे 270 गिगावॅट्सपर्यंत पोहोचू शकणारी मागणी देखील यशस्वीपणे पूर्ण करू शकू असा आत्मव़िश्वास वीज मंत्रालयानं व्यक्त केलाय...
तुलना मागील दोन वर्षांशी...
? गेल्या उन्हाळ्यात विजेची सर्वाधिक मागणी 242.77 गिगावॅट्स इतकी नोंदली गेली होती ती जूनमध्ये. मात्र हा आकडा सरकारच्या 277 गिगावॅट्सच्या अंदाजित पातळीपेक्षा कमीच राहिला...
? त्यापूर्वी 2024 मध्ये मे महिन्यात विजेची सर्वाधिक मागणी 250 गिगावॅट्सपर्यंत झेपावली होती. त्या वेळी हा विक्रम ठरला होता आणि सप्टेंबर, 2023 मध्ये नोंदवलेल्या 243.27 गिगावॅट्सच्या उच्चांकाला त्यानं मागं टाकलं होतं...
? या पार्श्वभूमीवर यंदा आणखी उच्चांक पाहायला मिळण्याची शक्यता आहे ती भारतीय हवामान विभागानं उन्हाळा तीव्र असेल असा अंदाज वर्तविल्यानं...तज्ञांच्या मते, विशेषत: चालू असलेल्या मे व जून महिन्यांत ही वाढ दिसून येईल...
सौरऊर्जेचा वाढता आलेख...
? सौरऊर्जा ही भारताच्या ऊर्जा विभागाचा मुख्य आधार म्हणून वेगानं उदयास येतेय...यामुळं देशाला विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत होण्याबरोबरच जीवाश्म इंधनावरील अवलंबन कमी करणंही शक्य होऊ लागलंय...
? अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार, यंदा 31 मार्चपर्यंत भारतानं 150.26 गिगावॅट्स इतकी स्थापित सौरऊर्जा क्षमता गाठली. ही वाढ ऊर्जा क्षेत्रातील सर्वांत वेगवान विस्तारांपैकी एक...
? केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, 2025-26 वर्षात सौरऊर्जेची निर्मिती 173.52 अब्ज युनिट्सवर पोहोचली. यामुळं अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमध्ये सौरऊर्जा हा सर्वाधिक वाटा उचलणारा विभाग ठरलाय...
? भारताच्या एकूण वीज क्षमतेचा विचार केल्यास बिगरजीवाश्म इंधनानं 50 टक्क्यांची पातळी ओलांडलीय. देशाच्या ऊर्जा रचनेत होत असलेल्या बदलाचे हे स्पष्ट संकेत...
? भारताचा सौरऊर्जा क्षेत्रातील प्रवास 2010 मध्ये जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियानासह सुरू झाला आणि त्यानंतरच्या एका दशकात या प्रक्रियेनं प्रचंड वेग घेतला...
? 2010 च्या दशकाच्या सुऊवातीला केवळ काही गिगावॅट्समध्ये असलेली भारताची सौरऊर्जा क्षमता 2026 पर्यंत वाढून 150 गिगावॅट्सपेक्षा अधिक झालीय. ही वृद्धी 2030 पर्यंत जीवाश्म इंधनावर आधारित नसलेली 500 गिगावॅट्स क्षमतेची वीजनिर्मिती साध्य करण्याच्या भारताच्या उद्दिष्टाशी सुसंगत अशीच...
? एक गिगावॅट म्हणजे एक अब्ज वॅट्स...
? एक गिगावॅट वीज ही 100 वॅट्सचे एक कोटी दिवे प्रज्वलित करण्यासाठी पुरेशी...
भारताची वाढत गेलेली सौरऊर्जा क्षमता...
वर्ष सौरऊर्जा निर्मिती (अब्ज युनिट्समध्ये)
2022-23 102.01
2023-24 116
2024-25 144.15
2025-26 173.52
भारताच्या ऊर्जा क्षेत्राची रचना...
प्रकार गिगावॅट्स वाटा
औष्णिक 174.56 66.9 टक्के
सौरऊर्जा 56.2 21.5 टक्के
पाण्यावरील वीजनिर्मिती 11.42 4.4 टक्के
अणुशक्ती 6.29 2.4 टक्के
वायू 5.2 2 टक्के
पवनचक्क्या 4.89 1.9 टक्के
इतर 2.11 0.8 टक्का
राखीव 0.2 0.1 टक्का
संकलन : राजू प्रभू