चंद्रशेखर आझादांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
8 वर्षे जुन्या प्रकरणात मोठी न्यायालयीन कारवाई
वृत्तसंस्था/ गाझियाबाद
आझाद पार्टीचे अध्यक्ष आणि नगिना मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद गंभीर अडचणीत सापडलेले दिसत आहेत. गाझियाबाद येथील खासदार-आमदार न्यायालयाने 2018 च्या एका प्रकरणात त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. साहिबाबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सदर प्रकरणात न्यायालयाने हे मोठे पाऊल उचलल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. न्यायालयाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर आझाद न्यायालयाच्या कामकाजात हजर राहिले नाहीत. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 323 आणि 305 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सुनावणीदरम्यान वकिलाने न्यायालयाला चंद्रशेखर आझाद यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्याची आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 82 आणि 83 अंतर्गत कारवाई सुरू करण्याची विनंती केली. कलम 82 नुसार एखाद्या व्यक्तीला फरार घोषित करण्याची तरतूद आहे, तर कलम 83 नुसार त्यांची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी आहे. तक्रारदाराचा अर्ज आणि सुनावणीदरम्यान चंद्रशेखर यांची अनुपस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले