भटक्या विमुक्त समाजाला शासकीय योजनाचा लाभ व्हावा
पल्लवी जी. : समन्वय बैठकीत समाजातील भटक्या लोकांच्या विविध समस्यांबाबत चर्चा
►प्रतिनिधी / बेळगाव
मागील अनेक वर्षापासून भटक्या विमुक्त जातीतील आदिवासी समाज सुसंस्कृत समाजापासून वंचित राहिला आहेत. वसाहत वाद, नैसर्गिक आपत्ती आणि इतर अपरिहार्य कारणामुळे हा समाज भटकंती करीत आहे. समाज कल्याण विभागानी भटक्या विमुक्त जातीतील समाजाला शासकीय योजना वेळेत पुरविणे आवश्यक आहे. या योजनापर्यंत एजंटाचा विळखा वाढला आहे. तो तातडीने थांबवावा. आणि लाभार्थ्यांना सुरळीत योजना पुरवाव्यात, असे आवाहन कर्नाटक राज्य अनुसूचित जाती आणि जमाती, भटक्या विमुक्त विकास महामंडळाच्या अध्यक्षा पल्लवी जी. यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले.
जिल्ह्यातील भटक्या विमुक्त समाजाच्या नेत्यासोबत एक समन्वय बैठक घेण्यात आली. यावेळी समाजातील भटक्या लोकांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली आहे. उदरनिर्वाहासाठी विखुरला गेलेला भटका समाज अद्याप अस्थिर आहे. त्यामुळे अनेक सोयीसुविधा आणि योजनांपासून वंचित राहिला आहे. या समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी समन्वय बैठक महत्त्वाची आहे. शासनाकडून मंजुर झालेल्या अनुदानाचा पुरेपूर विनीयोग समाजाला झाला पाहिजे. त्याबरोबर समाजातील नागरिकांना कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. अशा बँक अधिकाऱ्यांनाही योग्य निर्देश देण्याची जबाबदारीही अधिकाऱ्यांची आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहसंचालक नवीना शिंत्रे यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.