नोकियाची विस्तारासाठी एअरटेलसोबत हातमिळवणी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
नोकियाने भारती एअरटेलसोबत अब्जावधीचा विस्तार करार केला आहे. या करारांतर्गत, नोकिया अनेक वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय शहरांमध्ये त्यांची 4 जी आणि 5 जी उपकरणे बसविणार आहे. यासाठी भारती एअरटेलने बुधवारी या कराराची घोषणा केली आहे. भारती एअरटेलचे उपाध्यक्ष आणि एमडी गोपाल विट्टल म्हणाले की, हा करार एअरटेलसाठी कनेक्टिव्हिटी पुरवण्याच्या सेवेत सुधारणा करेल. ‘नोकियासोबतची ही धोरणात्मक भागीदारी आमच्या नेटवर्क विस्तारासाठी अधिक बळ देणारी ठरेल. याशिवाय, ते ग्राहकांना चांगल्या सेवेचा अनुभव देण्यासाठी सज्ज असेल. असे नेटवर्क प्रदान करेल जे पर्यावरणास अनुकूल असेल. नोकियाचे सीईओ म्हणाले की या करारामुळे एअरटेल ग्राहकांना प्रीमियम 5 जी कनेक्टिव्हिटी आणि उच्च दर्जाची सेवा मिळेल. नोकिया-एअरटेलची नेटवर्क उपकरणांसाठी दोन दशकांची भागीदारी नोकिया आणि भारती एअरटेलची नेटवर्क उपकरणांसाठी भागीदारी दोन दशकांहून अधिक जुनी आहे. दोघांनी अलीकडेच एअरटेलच्या नेटवर्कची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ‘ग्रीन 5जी इनिशिएटिव्ह’ लाँच केले.
दोन्ही कंपन्यांमधील सहकार्य मजबूत होणार : लुंडमार्क
नोकियाचे अध्यक्ष आणि सीईओ पेक्का लुंडमार्क म्हणाले की या करारामुळे दोन्ही कंपन्यांमधील सहकार्य मजबूत होईल आणि एअरटेलच्या नेटवर्कमुळे ऊर्जा कार्यक्षमता वाढेल.’