नोएल टाटा सहा प्रमुख कंपन्यांच्या संचालक मंडळातून होणार पायउतार
12 नोव्हेंबरला 70 वर्षांचे होणार नोएल टाटा : सेवानिवृती धोरणांतर्गत निर्णय शक्य्
वृत्तसंस्था/मुंबई
टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा 12 नोव्हेंबरला 70 वर्षांचे होत आहेत. टाटा समूहाच्या बिगर-कार्यकारी संचालकांसाठी असलेल्या सेवानिवृत्ती धोरणाचा भाग म्हणून, ते समूहाच्या 6 प्रमुख कंपन्यांच्या संचालक मंडळातून राजीनामा देणार आहेत. मात्र, ते टाटा ट्रस्ट्सचे नामनिर्देशित संचालक म्हणून टाटा सन्सच्या संचालक मंडळावर कायम राहतील. हा बदल अशावेळी होत आहे, जेव्हा टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्ती, टाटा सन्सची सूचीकरण (लिस्टिंग) आणि समूहाच्या प्रशासकीय नियमांवरून मतभेद आहेत.
या निर्णयाशी आणि संबंधित मुद्दे : .
संचालक मंडळातून पायउतार का होत आहेत?
नोएल हे टाटा ट्रेंट, व्होल्टास, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, टाटा इंटरनॅशनल, ट्रेंट हायपरमार्केट प्रायव्हेट लिमिटेड आणि दुबईस्थित टाटा इंटरनॅशनल वेस्ट एशिया डीएमसीसी यांच्या बिगर-कार्यकारी अध्यक्षपदावरून पायउतार होतील. याव्यतिरिक्त, ते टाटा स्टील आणि टायटन कंपनीचे बिगर-कार्यकारी उपाध्यक्ष आणि इंडिटेक्स ट्रेंट रिटेल इंडियाचे संचालक म्हणूनही राजीनामा देतील.
ते कोणत्या कंपनीत कार्यरत राहतील?
होय, ते ट्रेंट लिमिटेड आणि टेस्को यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘ट्रेंट हायपरमार्केट लिमिटेड‘च्या संचालक मंडळावर राहतील. ही कंपनी स्टार बाजार आणि स्टार डेली या नावांनी किरकोळ विक्रीची दुकाने चालवते.
वयाच्या 70 व्या वर्षी सेवानिवृत्तीचा नियम?
टाटा समूहाच्या प्रशासकीय चौकटीनुसार, कार्यकारी संचालकांसाठी सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे आणि बिगर-कार्यकारी/बिगर-स्वतंत्र संचालकांसाठी 70 वर्षे आहे. 12 नोव्हेंबर रोजी नोएल टाटा 70 वर्षांचे होत असल्याने, ते धोरणानुसार कार्यरत कंपन्यांच्या संचालक मंडळावरून पायउतार होत आहेत.
26 ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या पत्रात नोएल टाटा यांनी कोणते नवीन प्रश्न उपस्थित केले आहेत?
नोएल टाटा यांनी टाटा सन्स कंपनीचे सचिव सुप्रकाश मुखोपाध्याय यांना पत्र लिहून, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयात दाखल केलेल्या चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीच्या अर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी 17 सप्टेंबरच्या सभेचे अंतिम इतिवृत्त, मतदानाची नोंद आणि ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितले आहे.
