नोबेल पुरस्कार विजेत्या ब्रिटीश शास्त्रज्ञाचे निधन
94 वषीय पीटर हिग्ज दीर्घकाळापासून आजारी
वृत्तसंस्था/ लंडन
नोबेल पुरस्कार विजेते ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचे नुकतेच निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. त्यांनी ‘हिग्ज-बोसॉन’ कण म्हणजेच गॉड पार्टिकलचे महत्त्वपूर्ण संशोधन केले होते. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे महास्फोटानंतर विश्वाची निर्मिती कशी झाली हे स्पष्ट करण्यात मदत झाली. बोसॉन हे विश्व कसे एकत्र ठेवतात हे त्यांनी दाखवले. यासाठी त्यांना 2013 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक प्राप्त झाले होते. 8 एप्रिल रोजी त्यांनी स्वत:च्या घरी अखेरचा श्वास घेतला. एडिनबर्ग विद्यापीठाने त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. या विद्यापीठात ते अनेक वर्षे प्राध्यापक होते.
1960 च्या दशकात हिग्ज आणि इतर भौतिकशास्त्रज्ञांनी विश्व कशापासून बनले आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांनी भौतिकशास्त्राच्या मूळ प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. 2012 मध्ये शास्त्रज्ञांनी त्यावर माहिती जारी करत त्याला ‘हिग्ज-बोसॉन’ असे नाव देण्यात आले. 4 जुलै 2012 रोजी ‘हिग्ज-बोसॉन’ कणाच्या अस्तित्वाची पुष्टी झाल्याची घोषणा करण्यात आली. या संशोधनात ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांनी बहुमूल्य योगदान दिले होते.