दोन अमेरिकनांसह ब्रिटीश शास्त्रज्ञाला रसायनशास्त्रातील नोबेल
डेव्हिड बेकर, डेमिस हॅसाबिस, जॉन जम्पर यांचा गौरव : प्रथिनांची रचना स्पष्ट करण्यासाठी एआय मॉडेलची निर्मिती
वृत्तसंस्था/ स्टॉकहोम
डेव्हिड बेकर, डेमिस हॅसाबिस आणि जॉन जम्पर यांना प्रथिनांवर केलेल्या संशोधनाबद्दल बुधवारी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सरचिटणीस हॅन्स एल्ग्रेन यांनी या पुरस्काराची घोषणा केली. हॅसाबिस आणि जम्पर यांनी एक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेल तयार केले असून ते संशोधकांनी ओळखलेल्या जवळजवळ सर्व प्रथिनांच्या संरचनेचा अंदाज लावण्यास सक्षम आहे.
डेव्हिड बेकर हे सिएटलमधील वॉशिंग्टन विद्यापीठात काम करतात, तर हॅसाबिस आणि जम्पर हे दोघेही लंडनमधील गुगल डीपमाइंड येथे काम करतात. बेकर यांनी 2003 मध्ये एक नवीन प्रथिने तयार केल्यापासून त्यांच्या संशोधन गटाने प्रथिने, लस, नॅनोमटेरियल आणि लहान सेन्सर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रथिनांसह अनेक कल्पनाशील प्रथिनांची निर्मिती केल्याचे नोबेल समितीने सांगितले.