अमेरिकेला कोणताही शब्द दिलेला नाही
आयात करावर केंद्र सरकारचे संसदेत स्पष्टीकरण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आयात करासंबंधी भारताने अद्याप अमेरिकेला कोणताही शब्द दिलेला नसून त्या देशाशी एक व्यापक व्यापार करार करण्याच्या दिशेने प्रयत्न होत आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने संसदेत देण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारताने अमेरिकेच्या वस्तूंवर कर कमी करण्याचे आश्वासन दिले आहे, असे प्रतिपादन केले होते. तथापि, या संदर्भात कोणतेही आश्वासन अमेरिकेला दिलेले नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे.
भारताने अमेरिकेशी व्यापार करारासंदर्भात चर्चेला प्रारंभ केला आहे. दोन्ही देश एका विस्तृत आणि व्यापक व्यापार करारसंदर्भात बोलणी करीत आहेत. दोन्ही देशांमधील व्यापार वाढविणे आणि त्याची कक्षा अधिक रुंद करणे हे आमचे ध्येय आहे. त्यादिशेने चर्चा होत आहे. दोन्ही देशांना एकमेकांशी अधिक प्रमाणात व्यापार हवा आहे, असे लेखी उत्तर केंद्र सरकारने लोकसभेत सादर केले आहे.
प्रतिद्वंद्वी कर अद्याप नाही
आजच्या घडीला अमेरिकेने भारतावर कोणताही प्रतिद्वंद्वी कर किंवा रेसिप्रोकल टॅरीफ लावलेला नाही. एकमेकांना लाभदायक ठरेल अशा प्रकारे व्यापार वाढविण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे. तशा प्रकारची चर्चा प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. अमेरिकेशी भारत विविध क्षेत्रांमध्ये व्यापाराचा विस्तार करु इच्छित आहे. व्यापाराच्या वृद्धीत व्यापार कराचा आणि करबाह्या बाबींचा अडथळा येऊ नये, याचा प्रयत्न केला जात आहे. एकमेकांशी बहुक्षेत्रीय व्यापार वाढविण्यासाठी दोन्ही देश उत्सुक आहेत. विविध वस्तू आणि सेवांच्या पुरवठा साखळ्यांचे संमिलीकरण व्हावे, यासाठी प्रयत्न केला जात आहे. व्यापार वस्तू आणि सेवांचे बहुविधीकरण करुन व्यापार वाढविण्याचा हेतू आहे, असे या लेखी उत्तरात केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट केले आहे.
मुक्त व्यापारासाठी प्रयत्न
विविध देशांशी भारताची मुक्त व्यापारासंबंधी चर्चा होत आहे. आयात शुल्क कमी करणे, हे व्यापार वाढविण्यासाठी हिताचे ठरते. मुक्त व्यापारात दोन्ही बाजूंकडून कर कमी केले जातात. अशा प्रकारचे व्यापार धोरण पूर्वीही आचरणात आणले जात होते. तीच परंपरा आम्हीही पुढे नेत आहोत, असेही जतिन प्रसाद यांनी आपल्या लोकसभेत सादर केलेल्या लेखी उत्तरात विदित केले आहे.