युद्ध नाही, शांततेसाठी बुद्ध हवा : पंतप्रधान मोदी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
समस्या सोडविण्यासाठी युद्धाची नव्हे, तर बुद्धाच्या तत्वज्ञानाची आवश्यकता आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. येथील विज्ञान भवनात आयोजित ‘आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिन’ कार्यक्रमात ते भाषण करीत होते. जगाला शांततेच्या मार्गावर नेण्याचे सामर्थ्य भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानात आहे, असे प्रतिपादन त्यांनी या कार्यक्रमात गुरुवारी केले. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी परकीय आक्रमकांनी भारताची ओळख आणि संस्कृती पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वातंत्र्यानंतर गुलाम मानसिकतेच्या लोकांनी परकीय आक्रमकांचीच री ओढत भारताला त्याचा खरा परिचय होऊ दिला नाही. स्वातंत्र्यानंतर एका विशिष्ट गटाने भारताचा ताबा मिळविला. या गटाने भारताला त्याच्या ऐतिहासीक वारशाच्या विरुद्ध दिशेला नेले. यामुळे भारताची मोठी हानी झाली आहे, असे प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.
बुद्धाचा सन्मान
केंद्र सरकारने नुकताच पाली भाषेला अभिजात भाषेचा सन्मान दिला आहे. या केवळ या भाषेचा सन्मान नसून भगवान गौतम बुद्धाचा सन्मान आहे. केंद्र सरकारचा प्रयत्न भारताला त्याच्या मूळ संस्कृतीचा परिचय व्हावा असा आहे. आम्ही या संदर्भात आमचे उत्तरदायित्व योग्य रितीने पार पाडत आहोत. जनताही सहकार्य करीत आहे, असे विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
बौद्ध भिक्षूंचा सन्मान
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद मोदी यांनी विज्ञान भवनात अनेक बौद्ध भिक्षूंचा सन्मानही केला. देशाच्या विविध भागांमधून हे भिक्षू येथे आलेले आहेत. भारताच्या समाजजीवनात या भिक्षूंचे योगदान मोठे आहे. त्यांच्यामुळे भारताची संस्कृती समृद्ध झाली आहे, अशी भलावणही त्यांनी भाषणात केली.
केंद्र सरकारचा पुढाकार
अभिजात भाषा कोणत्या आहेत, त्यांचे निकष काय आहेत, या भाषा भारतात केव्हापासून आहेत, आदी विषयांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन अभ्यासगट निर्माण केला आहे. अभिजात भारतीय भाषांची एक श्रेणी निर्माण करण्यात आली आहे. अभिजात भाषेच्या मापदंडानुसार ती भाषा किमान 1,500 ते 2,000 वर्षे जुनी असली पाहिजे. या भाषेतील प्राचीन ग्रंथ आणि साहित्य यांचा संग्रह उपलब्ध असला पाहिजे. केंद्र सरकारने या निकषांच्या आधारावर पालीप्रमाणेच मराठी (प्राकृत), बंगाली आणि आसामिया भाषांना अभिजात भाषेचा सन्मान दिला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.