For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्गात २ ऑक्टोबरला ‘नो यूपीआय डे’

03:39 PM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिंधुदुर्गात २ ऑक्टोबरला ‘नो यूपीआय डे’
Advertisement

मालवण : प्रस्तावित यूपीआय व्यवहारांवरील ०.४ टक्के व्यापारी व्यवहार शुल्काला (एमडीआर) विरोध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने २ ऑक्टोबर रोजी ‘नो यूपीआय डे’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील व्यापारी संघटनांच्या आंदोलनाला पाठिंबा देत या दिवशी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी यूपीआय तसेच अन्य ऑनलाइन माध्यमातून पैसे स्वीकारू नयेत आणि शक्यतो रोखीने व्यवहार करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

या पार्श्वभूमीवर सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ आणि मालवण तालुका व्यापारी संघाने तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. २ ऑक्टोबर रोजी ग्राहकांकडून यूपीआय किंवा अन्य ऑनलाइन माध्यमातून पैसे स्वीकारण्याऐवजी रोखीने व्यवहार करून प्रस्तावित शुल्काबाबत व्यापाऱ्यांच्या भावना केंद्र शासनापर्यंत पोहोचवाव्यात, असे संघटनांनी म्हटले आहे.

व्यापाऱ्यांचा डिजिटल व्यवहारांना विरोध नाही

व्यापाऱ्यांचा यूपीआय किंवा डिजिटल व्यवहारांना विरोध नसून, अशा व्यवहारांवर प्रस्तावित करण्यात आलेल्या शुल्काचा आर्थिक भार व्यापाऱ्यांवर पडू नये, अशी भूमिका व्यापारी संघटनांनी स्पष्ट केली आहे. डिजिटल व्यवहारांचा वापर सातत्याने वाढत असताना त्यासाठी व्यापाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागू नये, अशी मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे.

Advertisement

शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

‘नो यूपीआय डे’च्या माध्यमातून प्रस्तावित व्यापारी व्यवहार शुल्काच्या मुद्द्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मालवण तालुक्यातील व्यापाऱ्यांनी २ ऑक्टोबर रोजी एक दिवस रोखीने व्यवहार करून या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर आणि मालवण तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर यांनी केले आहे.

Advertisement

.