पिण्याचा पाण्याची टंचाई नाही : पेयजलमंत्री
राज्यात सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध : ‘त्या’ दुकानदारांना आर्थिक मदत देणार
मडगाव : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला असला तरी राज्यात पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई भासणार नाही, असे पेयजलमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. राज्यात सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाऊस पडत नाही ही चिंतेची बाब आहे. पण, सध्यातरी पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. जूनच्या मध्यावरही आणखी दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध होता. पाणी व्यवस्थापनात करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणा आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासनाने घेतलेले विशेष परिश्र्रम यामुळेच हे शक्मय झाल्याचे मंत्री फळदेसाई म्हणाले.
धरणातील गाळ काढल्यास पाणीसाठा होऊ शकतो
मान्सूनचा पाऊस येण्यापूर्वी राज्यातील प्रमुख जलाशयांमध्ये आणि धरणांमध्ये नागरिकांची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला होता. आताही आवश्यक पाणी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना काही प्रमाणात समस्या येणार आहेत, त्यासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जातील. साळावली धरणातील गाळ काढण्यात आल्यास आणखी पाणीसाठा होऊ शकतो, असेही मंत्री श्री. फळदेसाई यांनी पुढे सांगितले.
राज्यात रोहिंग्या असल्यास काही अनर्थ घडण्यापूर्वी त्यांच्यावर नक्कीच कारवाई होणे आवश्यक आहे. राज्य सरकार त्यादृष्टीने कार्य करत आहे. सध्यातरी आपणाकडे याबाबत कोणतीही माहिती नसल्याने त्यावर भाष्य करणार नसल्याचे मंत्री श्री. फळदेसाई म्हणाले. रिवण-सांगे येथे सहा दुकाने आगीत जळाली असून त्या दुकानदारांना आवश्यक ती नुकसान भरपाई मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार तसेच वैयक्तिक आर्थिक मदतही केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले.
तिकीटाबाबत निर्णय पक्षाचा
राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीबाबत आपली तक्रार नाही. एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे आरक्षणाबाबतचा जो निर्णय असेल तो आपण स्वीकारणार आहे. आपण पक्षासाठी काम करतो. जे कुणी पुढे येतील, त्यांनाही गुणवत्तेवरच पुढे यावे लागेल. आरक्षण झाल्यास पक्ष आपणास कुणासाठी काम करायचे ते सांगेल, असेही सांगितले. तिकीट कुणाला द्यायचे हा निर्णय पक्ष घेणार आहे, असेही मंत्री फळदेसाई यांनी स्पष्ट केले.