For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवजात बालकांच्या मृत्यूची पुनरावृत्ती नको

11:48 AM Nov 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
नवजात बालकांच्या मृत्यूची पुनरावृत्ती नको
Advertisement

पालकमंत्री जारकीहोळी यांची अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना

Advertisement

बेळगाव : बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये (बिम्स) नवजात बालकांचे मृत्यूप्रकरण गंभीर असून यासंबंधी अधिकाऱ्यांनी योग्य कारण स्पष्ट करावे. शिवाय पुढील काळात अशी गंभीर घटना घडणार नाही याची दखल घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना केली. जिल्हा पंचायत कार्यालयात मंगळवारी झालेल्या आरोग्य खात्याच्या विकास आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री बोलत होते. बिम्समध्ये जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 2178 गर्भवती प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. यामध्ये जन्मलेल्या अर्भकांपैकी 1840 अर्भक बेळगाव जिल्ह्यातील तर 338 अर्भक परप्रांतातील होती. यापैकी 172 अर्भकांचा मृत्यू झाला. मात्र कोणत्याही अर्भकाचा एअर कॉम्प्रेसरच्या अभावामुळे मृत्यू झालेला नाही, असे बिम्सचे संचालक अशोक शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावर पालकमंत्र्यांनी असमाधान व्यक्त करीत बिम्सच्या संचालकांना खडेबोल सुनावले. ते म्हणाले की पुढील तीन महिन्यांत बिम्समधील सर्व समस्या दूर झाल्या पाहिजेत. कोणतीही अहितकारी घटना घडणार नाही, याची दखल घ्यावी. जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अभाव दिसून येतो. ही समस्याही दूर करून येथे मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. रुग्णांना दर्जेदार उपचार द्यावेत, सर्व प्रकारची औषधे रुग्णालयातूनच मोफत उपलब्ध करून द्यावीत, कोणतेही औषध बाहेरून खरेदी करण्यास रुग्णांच्या नातेवाईकांना सूचना करू नये, गैरप्रकार दिसून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्री जारकीहोळी यांनी दिला. बैठकीला आमदार असिफ (राजू) सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.